

पूर, रस्ता रुंदीकरण, वाहतूक कोंडीचे प्रश्न कायम
कल्याणीनगर-वडगाव शेरी या प्रभागात राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, क्रीडांगण, लाइट हाऊस, कल्याणीनगर नदीवरील पूल, टँकरमुक्त प्रभाग, अशी अनेक कामे झाली आहेत. मात्र, अजूनही पावसाळ्यात पूर परिस्थिती, रस्ता रुंदीकरण, कल्याणीनगर पबची समस्या, डीपी रस्ते विकसित करणे, वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटलेच नाहीत. (Latest Pune News)
वडगाव शेरीमध्ये गेल्या दहा वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत. तरी, अद्याप अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेजलाइनचे लीकेज, दूषित पाणीपुरवठा, मोकळ्या जागेत साठलेला कचरा, पावसाळ्यात रस्त्यावर साठलेले पाणी, पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसणे अशा अनेक समस्या अजूनही कायम आहेत. सांस्कृतिक हॉल नाही, पार्किंगचा विषय गंभीर आहे. अॅमिनिटी स्पेसच्या जागा विकसित केल्या नाहीत. वडगाव शेरीमध्ये अनेक मोठे प्रकल्प केले आहेत. पण, हे प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू नाहीत. लोकसंख्या आणि भविष्याचा विचार करून ड्रेनेजलाइन टाकण्याची गरज आहे.
प्रभागात या भागांचा समावेश
शास्त्रीनगर, कल्याणीनगर, हरीनगर-आदर्शनगर, रामवाडी, सैनिकवाडी, वडगाव शेरी गावठाण, साईनाथनगर, गलांडेनगर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, टेम्पो चौक, पुण्यनगरी, जुना मुंढवा रस्ता, सुंदराबाई शाळेपर्यंत, गणेशनगर संपूर्ण परिसर, आनंद पार्क
प्रभागातील प्रमुख समस्या
उज्ज्वल गार्डन, सैनिकवाडी, हरीनगर, कल्याणीनगर आणि इतर ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती होते.
छत्रपती संभाजी महाराज चौक ते सैनिकवाडी रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही.
वडगाव शेरी ते वारजे नदीपात्रातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.
भटक्या कुत्र्यांची समस्या कायम असून, मोकळ्या जागेत ठिकठिकाणी कचरा आहे.
कल्याणीनगरमधील पव मध्यरात्रीपर्यंत चालतात, रस्त्यावर वाहने पार्क केली जातात.
रामवाडीतील पालिका शाळेच्या अनेक समस्या आहेत.
वडगाव शेरी भाजी मंडईच्या इमारतीचा वापर होत नाही, व्यावसायिक गणेशनगर आणि इतर ठिकाणी रस्त्यावर भाजी विक्री करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
प्रभागात झालेली प्रमुख कामे
भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्ण झाले, वडगाव शेरीत नवीन पिण्याच्या पाण्याची लाइन आणि पाण्याच्या टाक्या केल्याने वडगाव शेरी टँकरमुक्त झाली आहे.
राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, सैनिकवाडी आणि कल्याणीनगरमध्ये क्रीडांगण, पार्किंग, जुना मुंढवा रस्तारुंदीकरण अशी कामे झाली आहेत.
कल्याणीनगर येथील नदीवरील पूल, सेंट अरनॉल्ड शाळेजवळ ड्रेनेजच्या लाइनचे काम सुरू आहे, या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.
वडगाव शेरीत अत्याधुनिक सेवा असणाऱ्या रुग्णालयाची गरज आहे. पालिकेची इंग्रजी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
पौर्णिमा गादिया, समाजसेविका, दिशा संस्था
वडगाव शेरीत गेल्या दहा वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. स्थायी समिती अध्यक्ष असताना प्रभागासाठी दोनशे कोटींपेक्षा जास्त निधी आणला आहे. रस्ते, पार्किंग, उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव, सांस्कृतिक हॉल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कल्याणीनगर आणि नगर रोडला पूल, स्वच्छतागृह अशी अनेक कामे करून वडगाव शेरीच्या विकासाला गती दिली.
योगेश मुळीक, माजी नगरसेवक
माझी पत्नी दिवंगत नगरसेविका शीतल शिंदे यांनी जुना मुंढवा रस्तारुंदीकरण, लक्ष्मीमाता सांस्कृतिक हॉल, सैनिकवाडी पूर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी कामे केली. वेकफिल्ड चौकातील रस्तारुंदीकरण, महिला बचत बाजार, लोणकर शाळेत मैदान अशी अनेक कामे पाच वर्षांत केली आहेत.
ज्ञानेश्वर शिंदे, माजी नगरसेवक
जुना मुंढवा रस्त्याचे रुंदीकरण केले. १०० टक्के विद्युत तारा भूमिगत केल्या आहेत. ड्रेनेजचे काम पूर्ण केले आहे. साईनाथनगर येथे सांस्कृतिक हॉल आणि उद्यान विकसित करण्यात येत आहे. स्मशानभूमीची विविध कामे करण्यात येत आहेत.
संदीप जन्हाड, माजी नगरसेवक
वडगाव शेरीमध्ये अनेक विकासकामे झाली आहेत. नागरिकांना उद्यान, क्रीडांगण, रस्ते, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधा आम्ही तयार केल्या आहेत. नाल्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात पूर परिस्थिती होणार नाही.
सुनीता गलांडे, मा़जी नगरसेविका