

मंचर : आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी नितीन सीताराम ढोबळे यांना उसाचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे. त्यांच्या शेतातील एका उसाला तब्बल 45 ते 50 उसाचे कांडे असून, एकरी 100 टनांहून अधिक ऊस उत्पादन अपेक्षित आहे. सध्या शेतात ऊसतोडणी सुरू असून, हा ऊस पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.(Latest Pune News)
ढोबळे यांनी आपल्या गट क्रमांक 699 मधील एक एकर क्षेत्रावर 86032 या जातीच्या ऊस बियाण्यांची लागवड 3 जून 2024 रोजी केली होती. ठिबक सिंचनाच्या साहाय्याने पाणीपुरवठा तसेच खते व औषधांचे नियोजन केल्यामुळे पाण्याची बचत तर झालीच; पण रोगराईवरही नियंत्रण ठेवता आले. दरम्यान, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत या उसाची तोडणी केली जात आहे.
या यशस्वी उत्पादनामागे भीमाशंकर कारखान्याचे ऊसविकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित, राजेंद्र दराडे तसेच खते-औषध विक्रेते दिलीप हिंगे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. नितीन ढोबळे यांनी उत्कृष्ट नियोजन, खते आणि पाणी व्यवस्थापन यांचा योग्य समन्वय साधला. ‘योग्य काळजी घेतल्यास उसापासून विक्रमी उत्पादन मिळू शकते, हे त्यांच्या ऊसबागेवरून स्पष्ट दिसते,’ असे माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी सांगितले.