

बारामती : नगरपरिषद निवडणूकांचा कार्यक्रम आता जाहीर झाला असून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 24 तास अगोदर म्हणजे 30 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेपर्यंतच जाहीर प्रचाराचा कालावधी राहणार आहे.(Latest Pune News)
निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जेथे हरकती असतील तेथे 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे, तर हरकती नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर ही अर्ज माघारीची अंतिम तारीख दिली गेली आहे. त्यामुळे प्रचारासाठी फारसा कालावधी हाती उरणार नाही. त्यासाठी आधीपासूनच उमेदवारांना गाठी-भेटीवर भर द्यावा लागणार आहे. निवडणूक प्रचार काळात प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक कामासाठी करता येणार नाही. विशिष्ट जाती-जमाती अथवा धर्माच्या सभा घेता येणार नाहीत.
आचारसंहितेच्या काळात निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम आदी संस्थांमध्ये तात्पुरत्या अथवा कंत्राटी पद्धतीने भरती करता येणार नाही. पूर्वी मुलाखती घेतल्या असल्यास त्यांना नेमणूक पत्रे देता येणार नाहीत. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी झालेली असली तरी निकाल जाहीर करता येणार नाही. प्रचार कालावधी संपल्यानंतर सोशल मीडिया (व्हाट्स ॲप, फेसबुक, एक्स आदी) आदी फ्लॅटफॉर्मवरूनही प्रचाराला बंदी असेल. प्रचारामध्ये प्राणी आणि पक्षी वापरास प्रतिबंध असेल.
मतदान काळामध्ये मंत्री अथवा राज्यमंत्री यांनी शासकीय वाहनांचा ताफा, पोलिस सुरक्षा सोबत घेऊन मतदान केंद्रांना भेटी देता येणार नाहीत. ही कृती मतदारांवर प्रभाव पाडणारी ठरू शकते. त्यामुळे निवडणुकामुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यास अडचणी निर्माण होतात. मंत्री, राज्यमंत्री यांना मतदान केंद्रात फक्त मतदानासाठीच येता येईल.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना ने-आण करण्यासाठी उमेदवार अथवा पक्षाला वाहने लावता येणार नाहीत. अशा वाहनांचा वापर होत असल्याचे लक्षात आले तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मतदान केंद्रावरील प्रतिनिधी नियुक्त करताना तो प्रतिनिधी त्याच प्रभागातील असावा असे बंधन घालण्यात आले आहे. अशा प्रतिनिधींची नावे निवडणूक अधिकाऱ्यांना 24 तास आधी द्यावी लागतील. गुन्हेगारीची नोंद असलेल्या व्यक्तींना मतदान प्रतिनिधी म्हणून नेमता येणार नाही.