

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वारगेट एसटी बसस्थानकात बस मागे घेत असताना एक प्रवासी बसखाली सापडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.६) सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. शिवाजी बापूराव कानडे (वय ६५, रा.कांबळेसर, तालुका बारामती) असे अपघातातील जखमी प्रवाशाचे नाव आहे. घटनेनंतर चालक गाडी सोडून फरार असून प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवाजी कानडे हे वृद्ध प्रवासी निराहून आले होते त्यांना कळंबोलीला जायचे होते. ते स्वारगेट एसटी स्थानकात थांबले असता फलटणहून लातूरकडे निघालेली बस क्रमांक (एम एच 14 बीटी 3538) ही बस मागे येत होती. बस मागे येत असल्याचे शिवाजी कानडे यांना न समजल्यामुळे त्यांना पाठीमागून बसची धडक बसली व त्यांचा डावा पाय बसखाली चिरडला गेला. या घटनेत ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर सातारा रोडवरील राव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचाराचा सर्व खर्च एसटीकडून देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.