

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारने केवळ कामगार विभागातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला होता.
आताच्या सरकारने सर्वच विभागातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. जे कोणी आज कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा निर्णय मागील सरकारचा आहे, असे बोलत आहेत, ते जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
गणेशोत्सवादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील गणेश मंडळांना भेट देवून दर्शन घेतले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा निर्णय मागील सरकारचा आहे. आम्ही केवळ अंमलबजावणी करत आहोत, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देत अजित पवार हे जनतेची दिशाभुल करत असल्याची टीका केली. हे नेते बोलतात एक अन करतात एक, त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी ठरवले पाहिजे, असेही आ. रोहित पवार म्हणाले.
ठाणे, नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मृत्यू होत आहेत. सरकारी रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने मुलांचा मृत्यू होत आहे. हे राज्य सरकारचे अपयश असून याची नैतिक जबाबदारी म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आ. रोहित पवार यांनी केली. तसेच आरोग्य विभागासह सर्वच विभागाच्या फाईल्सवर कार्यालयात सह्या न होता त्या हॉटेल्समध्ये नेल्या जातात. त्या ठिकाणी सह्या केल्या जातात. महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट करण्यासाठी रुग्णालयांना पैसे द्यावे लागतात. बील मंजूर करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. वर्तमानपत्रात मोठ्या जाहिरात देऊन, स्वतःचा मोठा फोटो लावून कोणी हिरो होत नाही, असा टोलाही आ. रोहित पवार यांनी सावंत यांना लगावला.
भाजपने पक्ष फोडले. कुटुंबेही फोडली. शिवसेना फोडून भाजपसोबत गेलेल्या सोळा आमदारांना न्यायालयाकडूनच अपात्र ठरविण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे, असा आरोप आ. रोहित पवार यांनी केला. भाजपला पक्षातील खडसे, मुंडे नंतर आता गडकरी यांच्यासारखे नेते पचत नाहीत. तर बाहेरून आलेले नेते कसे पचतील? असा सवाल करून भाजपचा अहंकार हा जनताच निवडणुकीत उतरवेल, असेही आ. रोहित पवार म्हणाले.
राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, पदवी असूनही काम नसणारे विद्यार्थी, आर्थिक अडचण असलेले विद्यार्थी या सर्वांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे ते नागपूर अशी 820 किमी.ची पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा येत्या 24 ऑक्टोबरला दसर्यानिमित्ताने सावित्रीबाई आणि महात्मा फुले तसेच लाल महाल येथे नतमस्तक होऊन आणि वढू तुळापूर येथे संभाजी महाराजांना वंदन करून सुरू होईल. नऊ ऑक्टोबरला यात्रेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होणार असल्याचेही आ. रोहित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा