पुणे : कोट्यवधी खर्चूनही अनेक रस्त्यांवर अंधार; स्क्वाडा यंत्रणा कुचकामी

पुणे : कोट्यवधी खर्चूनही अनेक रस्त्यांवर अंधार; स्क्वाडा यंत्रणा कुचकामी

हिरा सरवदे

पुणे : रस्त्यांवरील प्रकाश व्यवस्थेसाठी पालिकेने महिन्याला पावणेदोन कोटीप्रमाणे गेल्या चार वर्षांत 105 कोटी रुपये संस्थेला मोजले आहेत. तरीदेखील काही पथदिवे मध्यरात्री आणि पहाटे बंदच असतात. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍यांना अंधारामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा आणि भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे.

1 लाख 30 हजार एलईडी पथदिवे

महापालिकेने जवळपास 1 लाख 30 हजार एलईडी पथदिवे बसविले आहेत. यातील 90 हजार पथदिवे टाटा कंपनीने बसविले असून, उर्वरित महापालिकेने बसविले आहेत. या सर्व पथदिव्यांची देखभाल-दुरुस्ती टाटा कंपनीकडे आहे. पथदिव्यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात टाटा कंपनीने 1,500 स्क्वाडा यंत्रणा बसविली आहे. सिंहगड रस्त्यावरील स्क्वाडा सेंटर असून, या सेंटरमध्ये शहरातील कोणते पथदिवे बंद आहेत, याची माहिती मिळते.

अनेक रस्त्यांवर रात्री अकरानंतर किंवा पहाटे चार-पाचच्या दरम्यान पथदिवे बंद असतात. अनेक ठिकाणी उजेड पडण्याआधीच पथदिवे बंद केले जातात. त्यातच शहरातील रस्त्यांवर सेवा वाहिन्या, ड्रेनेज लाईन आणि समान पाणीपुरवठा पाइपलाइनसाठी खोदाईची कामे सुरू आहेत. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणार्‍या किंवा घरी जाण्यास उशीर होणार्‍या नागरिकांना रस्त्यावरील अंधारासह खोदकामे, खड्डे आणि कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते.

5 वर्षांत 66 लाख दंड

पथदिवे 48 तासांपेक्षा अधिक काळ बंद राहिल्यास प्रतिदिवा 50 रुपये दंड आकारला जातो. त्यानुसार मागील पाच वर्षांत टाटा कंपनीला 66 लाख 1 हजार रुपये दंड केल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाने दिली.

काही दिवसांपासून शहरातील पथदिवे पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान बंद केले जातात. त्यावेळी रस्त्यावर अंधार असतो. याबाबत संबंधित विभागात चौकशी केली असता, विभाग प्रमुखांचे आदेश दिल्याचे सांगितले जाते. तक्रार करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही.

                                                                             – गणेश वालतुरे, शनिवार पेठ

पथदिवे सायंकाळी लवकर सुरू केले जात होते, तर सकाळी उशिरा बंद केले जात होते. त्यामुळे सायंकाळी सात ते सकाळी सहा या वेळेतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पथदिवे बंद असल्याची नागरिकांनी 18008338811 या टोल फ— ी नंबर किंवा 9822098293 या मोबाईल नंबरवर तक्रार करावी. तक्रारीनंतर पथदिवे सुरू न केल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

                             – श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news