

खोडद: नारायणगाव - मांजरवाडी अष्टविनायक रस्त्यावर पिरसाहेब मंदिर ते स्मशानभूमी या 500 मीटर अंतरात धोकादायक वळण आहे. या वळणावर वारंवार अपघात होतात. येथे रविवारी (दि. 14) वळणाचा अंदाज आला नसल्याने ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाली. त्यामुळे या भागातील रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या रस्त्याचा या ठिकाणचा भाग खोलगट असल्याने पूर्वेकडून पश्चिमेकडे येताना उतार आहे. तसेच पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना देखील उतार आहे. त्यामुळे या परिसरात वाहनांचा वेग जास्त असतो. मात्र, या वळणावर बहुतांश चालकांची नियंत्रण सुटण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. हा धोका भविष्यातही कायम राहणार असल्याने त्याची वेळीच दखल घेण्यात यावी, असे स्थानिकांसह प्रवाशांचे म्हणणे आहे.
या भागात जिल्हा परिषद शाळा, गावठाण परिसर व पुढे वळणावर स्मशानभूमी असल्याने हे अपघात जीवावर बेतण्याची दाट शक्यता आहे. तसेच रस्त्याचे काम करताना गावठाण परिसरात गटाराला बसवलेली झाकणे नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
येथे उंच कठडे उभारावे. अपघात टाळण्यासाठी पट्टे मारून इतर उपाययोजना कराव्या. पूर्वेला मांजरवाडी गाव आहे, याठिकाणी टाकलेले फायबर गतीरोधक, तसेच मारलेले पट्टेदेखील नादुरुस्त झाले आहेत. गटारांची झाकणे नादुरुस्त झाली असल्याने ती तातडीने दुरुस्त करावीत, अशी मागणी जनकल्याण फाउंडेशन मांजरवाडी यांचे वतीने करण्यात येत आहे.
मांजरवाडी गावची सर्व रहदारी ही या रस्त्यालगत असल्याने नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडतांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे पुढील धोके टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी जनकल्याण फाउंडेशनचे उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनी केली.