

खडकवासला: सिंहगड रस्त्यावरील धायरीतील शिवकालीन श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात देशातील पहिल्या राजदंडाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 18 फूट उंच पुतळ्याचे रविवारी (दि. 14) केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यासह मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय शौर्याचा इतिहास विविध14 शिल्पांतून साकारण्यात आला आहे.
ऐतिहासिक राजदंड व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला रायरेश्वर शिवपीठाचे शिवाचार्य सुनीलस्वामी जंगम यांच्या हस्ते रविवारी सकाळी अभिषेक करण्यात आला. यासह शिवरायांना ढोल-ताशांच्या वादनातून व शिवशंभू गीत सादरीकरणातून मानवंदना देण्यात आली. या वेळी आमदार भीमराव तापकीर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह धायरी पंचक्रोशीतील ग््राामस्थ, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे यांच्या संकल्पनेतून व विघ्नहर्ता मंडळाचे अध्यक्ष किशोर दत्तात्रय पोकळे यांच्या सहा वर्षांच्या खडतर परिश्रमातून हा पुतळा उभारला आहे.
नामवंत शिल्पकार महेंद्र थोपटे व सुधाकर रणखांबे यांनी ऐतिहासिक संदर्भ व शिवकालीन दस्तऐवजांच्या आधारे राजदंडाधिष्ठित शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिल्पे साकारली आहेत. पुतळा बाँझ धातूत साकारला आहे. पुतळ्याचे वजन साडेचार टन इतके आहे. 14 समूहशिल्पांपैकी सात शिल्पे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर, तर सात शिल्पे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आहेत.
महापालिकेने पुतळ्याच्या चौथऱ्याच्या दगडासाठी तसेच 14 समूहशिल्पांसाठी 90 लाख रुपयांचा निधी दिला आहे. असे असले तरी पुतळ्यासाठी व इतर सुशोभीकरणासाठी विघ्नहर्ता मंडळाच्या वतीने तब्बल सव्वा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मुंबईतील कला संचानालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विघ्नहर्ता मंडळाचे अध्यक्ष किशोर पोकळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. या वेळी शिवरायांनी हातात राजदंड धारण करून रयतेच्या सार्वभौम राष्ट्राची घोषणा केली. राष्ट्र व धर्मरक्षणासाठी शिवरायांनी हाती राजदंड धारण करून राज्यकारभार केला. राज्याभिषेक नावाने नवीन कालगणना शक सुरू केला. शिवाजी महाराज हे जागतिक पहिल्या लोकशाहीवादी राष्ट्राचे निर्माते आहेत. शककर्ते व चक्रवर्ती लोकराजे आहेत. शिवरायांच्या मानवतावादी विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी राजदंडाधीश पुतळा व शिल्पे उभारण्यात येत आहेत.
किशोर पोकळे, अध्यक्ष, विघ्नहर्ता मंडळ