

पुणे: महानगरपालिकेच्या 2025-26 या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्षप्रमुख तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीसाठी कक्षप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून त्याचा अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
शहरातील एकूण 41 प्रभागांची विभागणी 15 प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आली असून, या विभागांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत 15 निवडणूक निर्णय अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार शहर निवडणूक अधिकारी तथा पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उपजिल्हाधिकारी व समकक्ष वर्ग-1 दर्जाच्या 15 अधिकाऱ्यांची विविध प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
येरवडा-धानोरी, शिवाजीनगर-घोलेरोड, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी, बिबवेवाडी, भवानी पेठ, कसबा- विश्रामबागवाडा, वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड, धनकवडी-सहकारनगर, कोंढवा-येवलेवाडी आदी विभागांतील संबंधित सहायक महापालिका आयुक्त कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये कार्यरत राहणार आहेत.
नियुक्त अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, निवडणूक नियमावली तसेच राज्य निवडणूक आयोग व शहर निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार निवडणूक कामकाज पार पाडावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेत पूर्णतः निःपक्षपाती भूमिका ठेवण्याच्या ठाम सूचना देण्यात आल्या असून, कोणत्याही प्रकारच्या पक्षपाती वर्तनाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.