

सासवड: पुरंदर तालुक्यातील गावरान पावट्याने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या जोरावर राज्यभरातील ग्राहकांना भुरळ घातली आहे. चव, पौष्टिकता आणि औषधी गुणधर्मांमुळे या पावट्याला बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील व्यापारी थेट पुरंदरमध्ये खरेदीसाठी दाखल होत आहेत. सध्या या पावट्याला प्रतिकिलो सुमारे १५० रुपये बाजारभाव मिळत आहे.
पुरंदर तालुक्यातील हवामान पावटा पिकासाठी पोषक ठरत असल्याने यंदाही शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. हिवरे येथील माऊली दत्तात्रय गायकवाड आणि मोनाली माऊली गायकवाड या दाम्पत्याने २२ गुंठे क्षेत्रात टोमॅटो पिकामध्ये अंतरपीक म्हणून गावरान पावट्याची लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करीत रासायनिक खतांचे चार डोस देऊन पिकाचे नियोजन केले. हिवरे येथील विकास दरेकर यांचे मार्गदर्शन आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर, यामुळे उत्पादन वाढण्यास मदत झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
दिवाळीनंतर बाजारात दाखल होणारा हा पावटा आकाराने किंचित वक्र असतो. स्थानिक बाजारपेठेत तो 'पानवडी' पावटा म्हणून ओळखला जातो. सध्या सासवड आणि ढुमेवाडी येथील बाजारपेठेत पेण, अलिबाग, पनवेल, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. पुणे शहराची जवळची बाजारपेठ उपलब्ध असल्याचा फायदा उत्पादकांना होत आहे.
पावटा पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेतही विक्रीसाठी पाठविला जातो. पावट्याच्या वाढत्या बाजारभावामुळे यंदा शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. पारंपरिक गावरान पिकांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कमी क्षेत्रातही चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, हे गायकवाड कुटुंबाच्या प्रयोगातून अधोरेखित होत आहे. या वेळी संगीता चव्हाण, आरती चव्हाण, मंदाबाई चव्हाण, राणी गोफणे, सुनंदा चव्हाण, नंदाबाई चव्हाण, अनिता चव्हाण, जनाबाई गोफणे, वर्षा चव्हाण आदी उपस्थित होते.
पुरंदरमध्ये ८७३ हेक्टरवर पावटा
पुरंदर तालुक्यात यंदा पावटा पिकाची एकूण ८७३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पीकवाढीसाठी सध्या पोषक वातावरण असून, पिकाची स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रसशोषक किडींचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळत आहे. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत जैविक पद्धतीने कीड व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पुरंदरचे कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले आहे.