

पुणे: साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. साहित्य परिषदेवर विद्यमानच, की नव्या चेहेऱ्यांना संधी मिळणार? याबाबतचे चित्र आज म्हणजेच रविवारी (दि.15) स्पष्ट होणार आहे.
परिषदेच्या 2026 ते 2031 साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीस टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या वास्तूत सकाळी साडेआठ वाजता सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपासून विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे परिषदेचा कारभार असल्याने यावेळी सत्तापालट होणार, की विद्यमान गटच पुन्हा सत्तेत येणार, याबाबत साहित्य क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यासह अकरा जिल्ह्यांत ‘मसाप’चे 16 हजार 607 मतदार आहेत. सध्याच्या पदाधिकाऱ्यांचे ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडी’ आणि ‘साहित्य संवर्धन आघाडी’ या दोन आघाड्यांमध्ये चुरस आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप, मतदार यादीतील दुबार तसेच निधन झालेल्या व्यक्तींच्या मतदार यादीत असलेल्या नावांबाबतच्या तक्रारी, मतपत्रिका घरपोच न पोहोचल्याने झालेले दुबार मतदान यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आहे..
निवडणुकीचा निकाल रविवारी (दि. 15) जाहीर होणार असून, परिवर्तन उत्कर्ष आघाडी येणार की साहित्य संवर्धन आघाडी येणार की संमिश्र निकाल लागणार, याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या मतमोजणीनंतरच्या निकालात कोणाचे पारडे जड राहणार, याबाबतची सर्वांना उत्सुकता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 2021 मध्ये कोरोनाचे कारण देऊन सर्वसाधारण सभेत निवडणुकीऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. मुदतवाढीमुळे विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती. आता साहित्य परिषदेवर पुनश्च वर्चस्व सिद्ध करण्यात परिवर्तन उत्कर्ष आघाडी यशस्वी होते की साहित्य संवर्धन आघाडीच्या माध्यमातून सत्तापालट होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे