

पुणे: राज्यात रब्बी हंगामात मुख्य पीक असलेल्या गहू आणि हरभऱ्याची शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून ज्वारीची पेरणी 84 टक्क्यांवर पोहोचली आहे. तरी एकूण रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीने सरासरी ओलांडून 101 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात यंदा पाणी उपलब्धता चांगली असून यापुढेही हवामानाने अनुकूल साथ दिल्यास रब्बीची पिके बंदा रुपया हाती येण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
खरीप हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शिवारात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. त्यामुळे ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्रांहून अधिक होण्याची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरल्याचे दिसून येते. कारण सरासरी 14.95 लाख हेक्टरइतके क्षेत्र असताना प्रत्यक्षात 12.63 लाख हेक्टरवरच ज्वारीचा पेरा पूर्ण झाल्याचे कृषि आयुक्तालयाच्या ताज्या अहवालातून दिसून येत आहे. ज्वारीच्या पेरण्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे.
शेतकऱ्यांनी ज्वारीबरोबरच मका पिकाच्या पेरणीस प्राधान्य दिल्याचे दिसून येते. कारण जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीच्या कडब्याप्रमाणेच मक्यालाही अधिक मागणी राहते. मक्याचे सरासरी क्षेत्र 3.75 लाख हेक्टर आहे. प्रत्यक्षात त्याहून अधिक म्हणजे 5.40 लाख हेक्टरवर (144 टक्के) पेरणी पूर्ण झालेली आहे.
रब्बी हंगामातील मुख्य पिकांमध्ये ज्वारीनंतर गव्हाचा समावेश होतो. शेतकऱ्यांनी यंदा गव्हाच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. सरासरी 11.80 लाख हेक्टरहून अधिक म्हणजे 12.19 लाख हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झालेली आहे. तसेच रब्बी हंगामात सर्वाधिक 25.16 लाख हेक्टरइतके क्षेत्र हरभरा पिकाचे आहे.
कमी पाण्यावर हरभरा पिक येत असल्याने सद्यस्थितीत 26 लाख 25 हजार 212 हेक्टरवर (104 टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांचा पेरा अंतिम होण्यास आणखी पंधरवडा जाण्याची अपेक्षा कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. त्यामध्ये गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांखालील क्षेत्राच्या पेरण्यांचा टक्का वाढण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली.