

वालचंदनगर: इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर ते जंक्शन रस्त्याच्या कामास वालचंदनगर कंपनीने हरकत घेतल्याने हे काम रखडले आहे. दरम्यान, कंपनीने रस्त्याच्या कामाला विरोध करू नये तसेच संबंधित विभागाने तातडीने काम सुरू करावे, या मागणीसाठी वालचंदनगर, कळंब, रणगाव व जंक्शन परिसरातील नागरिकांनी सोमवारी (दि. 5) वालचंदनगर कंपनीच्या पोस्ट कॉलनी गेटसमोर ठिय्या आंदोलन केले.
डाळज ते जंक्शन, वालचंदनगरमार्गे कळंबोली पुलापर्यंतच्या सुमारे 24 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला असून, या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने डाळज ते बोरी पाटीपर्यंतचा रस्ता पूर्ण केला आहे. मात्र, बोरी पाटी ते वालचंदनगर यादरम्यानचा रस्ता वालचंदनगर कंपनीच्या मालकीचा असल्याने, कंपनीने न्यायालयात हरकत घेतल्यामुळे हा टप्पा रखडला आहे. परिणामी संबंधित विभागाने कळंबोली पूल ते कळंबदरम्यानचे काम सुरू करून मधला महत्त्वाचा टप्पा वगळला आहे. जंक्शन ते वालचंदनगर हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, सध्या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थी, कामगार व नागरिकांना दररोज खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, कंपनीच्या हरकतीमुळे रस्त्याच्या कामासाठी मंजूर असलेला निधी इतरत्र वळवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा पसरल्याने परिसरातील नागरिकांत तीव संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी वालचंदनगर कंपनीच्या गेटसमोर आंदोलन छेडले. आंदोलनस्थळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी अनिल तिवारी तसेच वालचंदनगर कंपनीचे अधिकारी यांनी भेट दिली. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय फडतरे, माजी उपसभापती रोहित मोहोळकर, रामचंद्र कदम, सुहास डोंबाळे, सागर मिसाळ, शेखर काटे, हर्षवर्धन गायकवाड, राजेश जामदार, अंबादास शेळके, अतुल सावंत, राहुल रणमोडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
रस्त्याच्या कामाला कंपनीचा विरोध नाही: बुधवंत
रस्ता होण्यास वालचंदनगर कंपनीचा विरोध नाही. मात्र, हा रस्ता कंपनीच्या मालकीचा असून शासनाने कंपनीला योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. आंदोलकांच्या मागण्या कंपनी व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे वालचंदनगर कंपनीचे मानवसंसाधन व प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक विनायक बुधवंत यांनी सांगितले.
जुन्या रस्त्यावरच नवीन रस्ता करण्याचे न्यायालयाचे आदेश
यासंदर्भात माहिती देताना प्रतापराव पाटील म्हणाले, या रस्त्याच्या कामाबाबत न्यायालयाने जुन्या रस्त्याप्रमाणे 9 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने कोणत्याही विरोधाला न जुमानता तातडीने रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा येत्या काळात नागरिक तीव आंदोलन छेडतील.