

वडगाव निंबाळकर: गेल्या आठवड्यात कडाक्याच्या अंग गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागला. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाले आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याची स्थिती आहे.
गेल्या 8-15 दिवसांपासून थंडीचा कडाका अधिक होता. अतिथंडीचा परिणाम केळीपिकावर झाला आहे. आर्थिक सुबत्ता मिळवून देणारे पीक म्हणून अलिकडील काळात बारामती तालुक्यातील शेतकरी केळी उत्पादनाकडे वळला आहे. उसापाठोपाठ या पिकातून चार पैसे मिळतील या आशेने परिसरात केळीची मोठी लागवड झाली आहे. आडसाली उस तुटून गेल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेणे टाळून केळीसारख्या नगदी पिकाकडे वळणे पसंत केले आहे.
केळीपिकाच्या लागवडीसाठी मोठा खर्च येतो. तो शेतकऱ्यांनी करत लागवड केली. परंतु वातावरण बदलाचा अत्यंत अनिष्ट परिणाम केळीपिकावर होत आहे. केळी बागांवर करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीटकनाशक, बुरशीनाशकच्या फवारण्या वाढल्या आहेत. या थंडीच्या परिणामामुळे केळीपीक पिवळे पडून ते धोक्यात आले आहे. याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार असल्याने केळी उत्पादक सध्या धास्तावलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे आंबेगाव तालुक्यातील रब्बी पिकांवर रोग व किडीचा धोका निर्माण झाला आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा, मिरची आणि पालेभाज्या यांसारखी पिके सध्या दाणे भरण्याच्या स्थितीत असून, काही ठिकाणी कांदा पेरणीस तयार होत आहे, तर काही ठिकाणी उगवून जोर धरू लागला आहे.
पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले की, ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पाती करपणे सुरू झाले आहे, तर गहू व ज्वारीची पाने पिवळी पडत आहेत. याशिवाय पालेभाज्या व मिरच्यावर तुडतुडी व पाने खाणाऱ्या आळींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कीडनाशकांच्या फवारणीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
मागील दोन महिन्यांपासून रब्बी पिकांना थंडी पोषक ठरत होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे रोगराईची परिस्थिती गंभीर झाली आहे. धुक्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. डिसेंबरपासून पिकांची चांगली वाढ झाल्याने खरीप हंगामातील नुकसान भरपाईची अपेक्षा होती, मात्र अलीकडील हवामानातील बदलामुळे ही अपेक्षा धोक्यात आली आहे. शेतकरी म्हणतात की, वेगवेगळ्या संकटांमध्ये सावरताना या बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग व किडींचे प्रमाण वाढत आहे आणि त्याचा थेट परिणाम आर्थिक नुकसानावर होत आहे.