

इंदापूर: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली हजरत मलिकसाहेब बाबा उर्फ पीरसाहेब उरुसानिमित्त नामांकित कुस्त्यांच्या निकाली जंगी मैदानाने या उरुसाची उत्साहात सांगता झाली. सालाबादप्रमाणे गुरुवारी (दि. 1) संदलच्या कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पीरसाहेब यांच्या घोड्याची मिरवणूक (छबिना), शोभेचे दारूकाम व मनोरंजनासाठी कोल्हापूर येथील वैभव आर्केस्ट्रा हे कार्यक्रम यात्रेचे विशेष आकर्षण ठरले.
यात्रेनिमित्त शनिवारी (दि. 3) निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या 1 लाख 51 हजार रुपये इनामाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी पैलवान सतपाल सोनटक्के व समीर शेख यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत सतपाल सोनटक्के याला विजयी घोषित करण्यात आले.
याप्रसंगी कै. नवनाथ (दादा) ठवरे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमनाथ ठवरे पाटील यांच्या वतीने एक नंबरच्या कुस्ती विजेता पैलवान सतपाल सोनटक्के यास साडेतीन किलो वजनाची चांदीची गदा भेट देण्यात आली.
आखाड्यामध्ये कालीचरण सोलनकर विरुद्ध विक्रम घोरपडे आणि सुनील खताळ विरुद्ध जमीर मुलाणी या कुस्त्या बरोबरीत सुटल्या. वरकुटे गावातील पैलवान तेजस शिंदे व स्वप्नील दगडे यांनी नेत्रदीपक कुस्त्या करीत विजय संपादन केला. यावेळी ग््राामस्थांनी त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. आखाड्यास जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, श्रीमंत ढोले, विलास वाघमोडे आदींनी भेट दिली. आखाड्यामध्ये पैलवान पोपट शिंदे, राजकुमार शिंदे, राजाराम शेंडे, बबन शेंडे, जनार्दन यादव, उत्तम शेंडे, बबलू पठाण, शंकर शिंदे, गोविंद शेंडे, लक्ष्मण शेंडे आदींनी पंच म्हणून काम पाहिले.
यात्रा यशस्वी होण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव मिसाळ, ॲड. कृष्णाजी यादव, सरपंच बापूराव शेंडे, ॲड. शशिकांत शेंडे, शिवाजी यादव, नितीन शेंडे, रतन हेगडे, अस्लम मुलाणी, राज पाटील, संतोष मोरे, दत्तात्रय मासाळ, ॲड. संदीप शेंडे आदींनी सहकार्य केले. किरण म्हेत्रे, प्रवीण ठवरे व प्रा. शहानुर मुलाणी यांनी उत्कृष्टपणे कुस्त्यांचे निवेदन केले.