

पुणे: राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर ‘मिशन मुरघास’ ही जनजागृती व कृती मोहीम राबवण्यात येत आहे. उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासमध्ये रूपांतर करून भविष्यातील चाराटंचाईवर मात करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर, दुग्धोत्पादनावर तसेच पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सन २०२६-२७ च्या खरीप हंगामात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण बियाणे वाटपासाठी ४८.२० कोटी रुपये आणि विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत ३ कोटी रुपये, असा एकूण ५१.२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्याच्या चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून आणखी ६६.४१ कोटी रुपये आणि विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत १० कोटी रुपये, असा एकूण ७६.४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात चारा लागवड करून त्यापासून मुरघास निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
शास्त्रीय पद्धतीने मुरघास निर्मितीवर भर
‘मिशन मुरघास’अंतर्गत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान आणि स्मार्ट योजनेअंतर्गत मुरघास उत्पादक व विक्रेते यांच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना मुरघास निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. चाऱ्याची योग्य वेळी कापणी करणे, कुट्टी करणे, दाबणी करून हवाबंद साठवणूक करणे या प्रक्रियांचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाईल. सहकारी दूध संघ, दूध संकलन संस्था, महिला बचत गट, ग्राम संघ, शेतकरी उत्पादक गट, कृषी विज्ञान केंद्रे आणि ग्रामस्तरीय यंत्रणेच्या सहभागातून गावोगावी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. मका, ज्वारी आणि नेपिअर यांसारख्या कमी कालावधीत तसेच तुलनेने कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या चारा पिकांपासून मुरघास तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
१९ जिल्ह्यांत ‘मागेल त्याला मुरघास’ योजना
विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमधील दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालकांसाठी ‘मागेल त्याला मुरघास’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळ्यातील आणि दुष्काळी परिस्थितीतील वैरण टंचाईवर मात करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत पात्र पशुपालकांना प्रतिजनावर प्रतिदिन ५ किलो मुरघास, ९० दिवसांसाठी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रतिकिलो ३ रुपये अनुदान देय आहे. संबंधित १९ जिल्ह्यांतील पात्र दूध उत्पादक शेतकरी व पशुपालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मुरघास खरेदीचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. इच्छुक शेतकरी व पशुपालकांनी https:///vmddp.com/ या संकेतस्थळावर जाऊन योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
प्रत्येक जिल्ह्याने वैरण बियाणेवाटप, चारा उत्पादन आणि मुरघास निर्मितीची उद्दिष्टे निश्चित करून जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करावा. तसेच, या मोहिमेला क्षेत्रीय स्तरावर प्राधान्य देऊन तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला चाराटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासात रूपांतर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. यामुळे टंचाईच्या काळात जनावरांचे पोषण आणि दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होईल. विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमधील दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांनी ‘मागेल त्याला मुरघास’ योजनेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.