Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा रुग्णालयांवर ताण; खाटांसाठी प्रतीक्षा, आठवर्षीय मुलीच्या रक्तनमुन्यांची फेरतपासणी

ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात ४२९ संशयित रुग्ण; माहिती देण्यास विलंब झाल्याने रुबी हॉल क्लिनिकला महापालिकेची नोटीस, एनआयव्हीच्या अहवालाकडे लक्ष
Dengue Cases
Dengue CasesPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयांमधील आरोग्यव्यवस्थेवर ताण वाढला आहे. अनेक खासगी रुग्णालयांत खाटा मिळविण्यासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असून, सामान्य कक्षापासून खासगी खोल्या आणि आपत्कालीन विभागांपर्यंत रुग्णांची गर्दी वाढली आहे. रुग्ण बरे होण्यासाठी अधिक काळ लागत असल्याने नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ काही रुग्णालयांवर आली आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना प्राधान्य दिले जात असून, कमी गंभीर रुग्णांना घरी उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

Dengue Cases
गुंतागुंतीची प्रसूती स्थिती हाताळण्यात रुबी हॉल क्लिनिकला यश

पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत डेंग्यूचे ४२९ संशयित रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये ५०८, तर ऑगस्टमध्ये ४८४ संशयित रुग्णांची नोंद झाली. जानेवारीपासून शहरात दोन हजारांहून अधिक संशयित, ९७ निश्चित डेंग्यू रुग्ण आणि चिकुनगुनियाचे ३५ रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरमध्ये टायफॉइडचेही ३२ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. दिवसे्ंदिवस ही संख्या वाढत असून, अनेकांनी डेंग्यूसदृश उपचारापोटी खासगी रुग्णालयांमध्ये धाव घेतली आहे.

Dengue Cases
Someshwar Sugar Factory Chairman: सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी सात नावे चर्चेत; सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसत आहे. यंदा रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अनेक रुग्णालयांत एक ते दोन दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. डेंग्यूबरोबरच टायफाइडमुळे खाटांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे कमी वयाच्या, सहव्याधी नसलेल्या रुग्णांपेक्षा वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना प्राधान्य द्यावे लागते, असे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. पीयूष चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, या हंगामात डेंग्यू किंवा डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांना दाखल करावे लागत आहे. काही जण ताप सुरू होताच रुग्णालयात येतात, तर काही जण गुंतागुंत झाल्यानंतर दाखल होतात. यंदा तापातून बरे होण्यास अधिक वेळ लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्णांना घरी सोडण्यास विलंब होऊन खाटांवरील ताण वाढतो, असे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. सुजाता रेगे यांनी नमूद केले.

परिणामी रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांना घरी सोडण्यास लागणारा अधिक वेळ यामुळे नियमित ऐच्छिक शस्त्रक्रियांसाठी उपलब्ध वेळ कमी झाला आहे. आपत्कालीन विभागांवरही ताण वाढत असून, रुग्णालयात दाखल होण्याची गरज असलेल्या रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे खासगी रुग्णालयांकडून स्पष्ट करण्यात आले.

Dengue Cases
Kojagiri Sarasbaug Mahalaxmi Temple: पुण्यातील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात ५६ भोगांचा अन्नकोट; कोजागरी पौर्णिमा भक्तिभावात साजरी

आता एनआयव्हीकडून रक्तनमुन्यांची फेरतपासणी

शहरात डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या आठवर्षीय मुलीच्या रक्तनमुन्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आठवडाभराच्या आत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, डेंग्यूच्या रुग्णांची माहिती वेळेत न कळवल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकला नोटीस बजावली आहे. मुलीच्या डेंग्यू चाचणीचा सविस्तर प्रयोगशाळा अहवाल सादर करण्याचे आदेशही रुग्णालयाला देण्यात आले आहेत.

संबंधित मुलीला ताप आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात डेंग्यूचे निदान, उपचार आणि मृत्यूचे नेमके कारण, याबाबत स्पष्टता येण्यासाठी वैद्यकीय अहवालांची तपासणी करण्यात येत आहे. रक्तनमुन्यांच्या फेरतपासणीमुळे डेंग्यूच्या निदानाची पडताळणी होण्यास मदत होणार आहे.

डेंग्यूच्या रुग्णांची माहिती तातडीने महापालिकेच्या कीटक प्रतिबंध विभागाला कळवणे रुग्णालयांना बंधनकारक आहे. मात्र, संबंधित मुलीच्या प्रकरणात ही माहिती वेळेत देण्यात आली नसल्याचे महापालिकेने नोटिशीत नमूद केले आहे. माहिती देण्यास विलंब का झाला, याचा खुलासा रुग्णालयाकडून मागविण्यात आला आहे.

Dengue Cases
Baramati Water Shortage: बारामतीच्या बागायती पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट; वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडण्याची मागणी

सविस्तर अहवाल मागविला

मुलीची डेंग्यू चाचणी कोणत्या पद्धतीने करण्यात आली आणि त्याचा निष्कर्ष काय होता, याचा सविस्तर प्रयोगशाळा अहवालही महापालिकेने मागवला आहे. तसेच, रक्ताचे नमुने शीतसाखळी कायम ठेवून महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्याकडे तातडीने सुपूर्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे नमुने एनआयव्हीकडे पाठवून फेरतपासणी केली जाणार आहे.

रुबी हॉल क्लिनिकला महापालिकेची नोटीस मिळाली आहे. नोटिशीतील मुद्दे आणि संबंधित वैद्यकीय अहवाल तपासून याप्रकरणी सविस्तर उत्तर देण्यात येईल, एनआयव्हीचा अहवाल आल्यानंतर निदानाबाबत अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.

डॉ. विवेक लाल, वैद्यकीय संचालक, रुबी हॉल

डेंग्यूची गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर रुग्ण उपचारासाठी आल्यास बरे होण्याचा कालावधी वाढतो. साधारण रुग्णाला पूर्णपणे बरे होण्यासाठी तीन ते चार दिवस, तर गुंतागुंत असलेल्या रुग्णाला सात ते आठ दिवस लागत आहेत. दुसऱ्यांदा झालेला संसर्ग आणि सहव्याधींमुळे उपचार अधिक काळ चालू शकतात. त्यामुळे खाटा अधिक दिवस व्यापल्या जात आहेत.

डॉ. अपर्णा कोडरे, औषधोपचारतज्ज्ञ, नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर

डेंग्यू, चिकुनगुनिया, इन्फ्लूएंझा आणि अन्य विषाणूजन्य संसर्गांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना विशेष धोका असतो. रुग्णाची प्रकृती, गुंतागुंतीची तीव्रता आणि खाटांची उपलब्धता यानुसार दाखल करण्याचा निर्णय घेतला जातो. वेळेवर वैद्यकीय सल्ला, लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे गुंतागुंत कमी करता येईल.

डॉ. वैशाली पाठक, सल्लागार, औषधोपचार विभाग, सह्याद्री हॉस्पिटल्स, डेक्कन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news