

पुणे : राज्यातील 4 लाख 48 हजार उच्चदाब व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांना महावितरणकडून जागतिक दर्जाची तत्पर वीजसेवा देण्याची प्रक्रिया ऑनलाइन 'स्वागत सेल' पोर्टलमुळे अतिशय पारदर्शक व वेगवान झाली आहे.
उद्योगांना वाढीव वीजभाराच्या मागणीनुसार सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होण्यासोबतच विविध प्रश्न व तक्रारी सोडविण्याचा वेगही वाढला आहे. याबरोबरच महावितरणसोबतच 24 बाय 7 थेट संवाद साधण्यासाठी या पोर्टलद्वारे राज्यातील 278 औद्योगिक संघटना 'कनेक्टेड' झाल्या आहेत.
दरम्यान ऑनलाइन पोर्टलसह औद्योगिक संघटना व वीज ग्राहकांसोबत स्थानिक अधिकार्यांच्या बैठकांसह महावितरणच्या थेट मुख्यालयातून संचालक व कार्यकारी संचालक स्तरावर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वतंत्र बैठका घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे वीजपुरवठा, नवीन वीजजोडणी, बिलिंग व इतर मुद्द्यांबाबत औद्योगिक संघटना व ग्राहकांनी मांडलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी महावितरणने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माहितीसाठी पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. आतापर्यंत 124 कार्यपूर्ती अहवाल अपलोड करण्यात आले आहेत. पोर्टलद्वारे व बैठकांमध्ये प्राप्त झालेल्या विविध 242 पैकी 215 तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात आले तर ऊर्वरित 27 प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन वीजयंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरु आहे.
महावितरणकडून औद्योगिक वर्गवारीत लघु व उच्चदाबाच्या दरवर्षी सुमारे 23 हजारांवर नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. सद्यस्थितीत औद्योगिक ग्राहकांचा एकूण वीजवापरात 43 टक्के तर महसुलात 41 टक्के वाटा आहे. राज्यातील औद्योगिक ग्राहकांना थेट संवादासाठी, विविध प्रश्न मांडण्यासाठी तसेच प्रश्नांचे पारदर्शक पद्धतीने व तत्पर निराकरण करण्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली असून महावितरणने औद्योगिक ग्राहक व संघटनांसाठी संकेतस्थळावर स्वतंत्र 'स्वागत सेल' पोर्टल कार्यान्वित केले आहे.
महावितरणच्या 'स्वागत सेल' पोर्टलवर लॉगिनद्वारे लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना वीजभार वाढीसह विविध ग्राहकसेवांसाठी मागणी अर्ज तसेच वीजपुरवठा व बिलिंगबाबतच्या तक्रारी करणे सोयीचे झाले आहे. ऑनलाइन अर्ज किंवा तक्रारींबाबत ताबडतोब कार्यवाही करण्यात येत आहे. यासह वीजसेवेसंबंधी सूचना, प्रश्न किंवा विविध मुद्द्यांवर थेट संवाद साधण्यासाठी औद्योगिक संघटनांना स्वतंत्र लॉगिनद्वारे 'स्वागत सेल' पोर्टलवर विशेष स्थान देण्यात आले आहे. राज्यातील 278 औद्योगिक संघटनांनी लॉगिनद्वारे नोंदणी केली आहे. यात पुणे प्रादेशिक विभागातील 87, कोकण- 83, नागपूर- 80 आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील 28 औद्योगिक संघटनांचा समावेश आहे.