

पुणे : गेल्या काही दिवसांपासून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी शहरात धुडघूस घातला असून, कात्रज, मांजरी भागातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि मांजरी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज भागातील निंबाळकरवाडी परिसरातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख १४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निंबाळकरवाडी भागातील ऑरा नेस्ट सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी २० डिसेंबर रोजी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने, रोकड असा एक लाख १४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.
हडपसरमधील मांजरी बुद्रुक भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख ५७ हजार रुपयांचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला मांजरीतील माऊली रेसीडन्सी सोसायटीत राहायला आहेत. १० डिसेंबर रोजी त्या परगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. १८ डिसेंबर रोजी त्या गावाहून परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत.