

शंकर कवडे
पुणे: मध्य प्रदेशातील मटारचा हंगाम बहरल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात मटारची आवक वाढली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत आवक दुपटीने वाढल्याने दरात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली. मटारचे भाव उतरल्याने त्याचा परिणाम पावट्यावरही झाल्याचे दिसून आले. मागणीअभावी पावट्याच्या दरातही घसरण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक-जावक कायम राहिल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 7) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहिली.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 100 गोणी, राजस्थानातून गाजर 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग 2 टेम्पो, मध्यप्रदेश मटार 20 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 250 ते 300 क्रेट्स, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 7 ते 8 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, घेवडा 3 ते 4 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 70 ते 80 टेम्पो इतकी आवक झाली होती.
कोथिंबीर महागली : मेथी, पालक, कांदापात, पुदीना स्वस्त
मार्केट यार्डात मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे घाऊक बाजारात जुडीच्या भावात 7 रुपयांनी वाढ झाली आहे. मागील रविवारी (दि. 30 नोव्हेंबर) 1 लाख 75 जुडी झालेली आवक आज (दि.7) 1 लाख 50 हजार जुडी झाली. घाऊक बाजारात जुडीला दर्जानुसार 8 ते 15 रुपये भाव मिळत आहे. तर आवकच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे मेथी, शेपू आणि पालकच्या भावात घाऊक बाजारात प्रत्येकी 5 रुपयांनी घट झाली आहे.
याबरोबरच कांदापातच्या भावात 3 रुपये आणि करडई आणि पुदीनाच्या भावात प्रत्येकी 2 रुपयांनी घट झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिर वगळता सर्व पालेभाज्यांच्या जुडीचे भाव 12 रुपयांच्या आतमध्ये असल्याचे या वेळी सांगण्यात आले.