

कसबा पेठ : छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा... असा जयघोष. पुणेकरांनी शिवरायांची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव... अशा शिवमय वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्र्याहून सुटका स्मृतिदिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा पुण्यात उत्साहात पार पडला.
'शिवरायांच्या आग्र्याहून सुटका' या घटनेला 359 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालखी सोहळा व उत्सवाचे आयोजन करण्यात आले. श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 45 व्या दुर्ग राजगड उत्सवदिनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुखरूप किल्ले राजगड येथे परतले. त्या घटनेला 358 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्ताने पुण्यामध्ये लाल महाल येथे पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. सदानंद मोरे लेखक (इतिहास संशोधक, प्रवचनकार) पांडुरंग बलकवडे, पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप, डॉ. सचिन जोशी, राजगडाचे गडकरी सूर्यकांत भोसले, सोहळ्याचे पालक विश्वस्त किशोर चव्हाण, आशिष पाळंदे, मंडळाचे संजय दापोडीकर, मंगेश राव , अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, समिर रुपदे, योगेंद्र भालेराव, अमित दारवटकर, अमोल व्यवहारे, सागर चरवड, सतिश सोरटे, वीरेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
यंदा सोहळ्याचे 45 वे वर्ष आहे. आग्र्याहून सुटकेचा दिवस हा शिवरायांचा पुनर्जन्म होता. त्यामुळे दरवर्षी पुण्यात आणि गडावर उत्सव साजरा होतो. यंदा 13 व 14 डिसेंबर रोजी दुर्ग राजगडावर सांस्कृतिक कार्यक्रम, स्थिर वादन, मर्दानी खेळ तसेच 'आग्र्याहून सुटका एक थरार' सारंग मांडके व सारंग भोईरकर असे विविध कार्यक्रम होणार आहेत.