

Lohagad Fort Viral Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या लोहगड किल्ल्यावर सिगारेट ओढणाऱ्या काही पर्यटकांना एका स्थानिक नागरिकाने चांगलाच जाब विचारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि पर्यटकांच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, दिल्लीहून आलेल्या काही तरुण-तरुणींचा एक ग्रुप लोहगड किल्ल्यावर फिरत असताना सिगारेट ओढत होता. हे पाहून एका स्थानिक व्यक्तीने त्यांना रोखले आणि लोहगड केवळ पर्यटनस्थळ नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित पवित्र आणि ऐतिहासिक वारसा असल्याची जाणीव करून दिली.
सुरुवातीला संबंधित पर्यटकांनी किल्ल्यावर "नो स्मोकिंग"चा फलक दिसला नसल्यामुळे आपण सिगारेट पेटवल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिक नागरिकाने पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यावर पर्यटकांनी आपणास येथे धूम्रपान करण्यास मनाई असल्याची माहिती नव्हती, असे स्पष्टीकरण दिले. यानंतर त्या स्थानिकाने पर्यटकांकडील सिगारेटचे पाकीट ताब्यात घेतले आणि भविष्यात अशा प्रकारची कृती पुन्हा करू नका, अशी समज दिली.
ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत आहे. काही तासांतच या व्हिडिओला 1.84 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी स्थानिक नागरिकाच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तर काहींनी ऐतिहासिक किल्ल्यांवर धूम्रपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची अधिकृत माहिती नाही.
याआधीही लोहगड किल्ला केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. या प्रकरणात केतन अग्रवाल याला त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी किल्ल्यावरून खाली ढकलल्याचा आरोप असून या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती.
लोहगडसारखे ऐतिहासिक किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. अशा ठिकाणी धूम्रपान, मद्यपान किंवा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणाऱ्या प्रकारांबाबत पर्यटकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याची भावना या घटनेनंतर पुन्हा एकदा व्यक्त केली जात आहे.