Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडाला एक महिना; अपघातातून उलगडलेल्या कटाची धक्कादायक कहाणी, डिजिटल पुराव्यांनी उघडले रहस्य

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात प्रेमसंबंध, नियोजन आणि तांत्रिक तपासाचे धागेदोरे; सिया-चेतन न्यायालयीन कोठडीत
Ketan Agarwal Murder Case
Ketan Agarwal Murder CasePune
Published on
Updated on

महेंद्र कांबळे

पुणे: एका आईने मुलाला आनंदाने फिरायला जाताना निरोप दिला होता; काही तासांनी त्याच मुलाचा मृतदेह दरीतून बाहेर काढावा लागेल, याची कल्पनाही तिला नव्हती. ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला, त्यांच्याच भोवती संशयाचे वादळ घोंघावू लागले आणि अपघात म्हणून समोर आलेल्या घटनेचे रूपांतर खुनात झाले. केतन अग्रवाल यांच्या मृत्यूला आज एक महिना पूर्ण होत असताना, हा गुन्हा आजही प्रत्येक पालकाच्या काळजाचा ठोका चुकवतो. मृत्यूमागील कटाचा एक-एक धागा पोलिस तपासात उलगडत गेला आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये या प्रकरणाची नोंद झाली. प्रत्येक नव्या खुलाशाने अंगावर काटा आणला आहे. केतनाला लोहगडावर थंड हवेच्या ठिकाणी नेणाऱ्या सियाला आता कारागृहाची हवा खावी लागत आहे.

Ketan Agarwal Murder Case
Pune Minor Student Bike Riding Action: पुण्यात अल्पवयीन विद्यार्थ्यांची दुचाकी स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिस-आरटीओची कारवाई

लोहागड किल्ल्यावरील विंचू काटा परिसरात १८ जून २०२६ रोजी घडलेल्या उद्योगपती केतन अग्रवाल याच्या खुनाला आज (१८ जुलै) एक महिना पूर्ण झाला. सुरुवातीला पाय घसरून झालेला अपघात वाटणारी ही घटना पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले आणि राज्यभर खळबळ उडाली. प्रेमसंबंध, कुटुंबीयांचा दबाव, लग्नाची तयारी आणि अत्यंत थंड डोक्याने आखलेला कट अशा अनेक धक्कादायक पैलूंनी हे प्रकरण गेल्या महिनाभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांची फेब्रुवारी २०२६ मध्ये एंगेजमेंट झाली होती. नोव्हेंबरमध्ये विवाह निश्चित झाला होता. राजस्थानमधील आलिशान पॅलेसमध्ये लग्न, बाली येथे प्री-वेडिंग शूट अशा तयारीला वेग आला होता. मात्र, दुसरीकडे सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय तपासात पुढे आला. पोलिसांनी केलेल्या तपासात दोघांनी मिळून केतनला कायमचा मार्गातून हटविण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.

Ketan Agarwal Murder Case
Pune Drop Shipping Online Fraud: ‘ड्रॉप शिपिंग’च्या आमिषाने पुण्यात २१.७० लाखांची ऑनलाइन फसवणूक; फेसबुक मैत्रीतून गंडा

एक नव्हे, तीन प्रयत्न... अखेर १८ जूनला कट यशस्वी

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार मे आणि जून महिन्यात केतनला वारंवार लोहागड किल्ल्यावर नेण्यात आले. ३१ मे रोजी पहिला प्रयत्न फसला. त्यानंतर १४ जून रोजी सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने झुडूप पकडून स्वतःचा जीव वाचविल्याने हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. त्यावेळी "साप दिसल्यामुळे धक्का बसला," असे कारण देत हा प्रकार झाकण्यात आल्याचा संशय आहे.

१७ जून रोजी पुण्यातील एका कॅफेमध्ये सिया आणि चेतन यांची अंतिम बैठक झाल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. त्यानंतर १८ जून रोजी सकाळी केतन सियाला घेऊन लोहागडवर गेला. चेतनने टोल कॅमेरे टाळण्यासाठी स्कूटरचा वापर केल्याचे आणि हूडी घालून ओळख लपविल्याचे तपासात समोर आले. विंचू काटा परिसरात पूर्वनियोजित संकेत मिळाल्यानंतर केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेनंतर सियाने केतनच्या आईला फोन करून "पाय घसरला" अशी माहिती दिली होती.

Ketan Agarwal Murder Case
Pune Police Mission Crackdown: पुणे पोलिसांची ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहीम वेगात; गुटखा तस्करी आणि मटका अड्ड्यावर कारवाई, १२ जण अटकेत

डिजिटल पुराव्यांनी उलगडला कट

या प्रकरणातील सर्वात मोठा धागा डिजिटल पुराव्यांचा ठरला. पोलिसांनी केलेल्या तपासात सिया आणि चेतन यांच्यातील हजारो कॉल्स, अनेक तासांचे संभाषण, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्यात आले. दोघांनी चॅट्स डिलीट केल्याचा संशय असून, ते फॉरेन्सिक पद्धतीने पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू आहे. तपासात "मर्डर मेथड्स"सारखे इंटरनेटवरील शोध, पोलिस चौकशीला काय उत्तरे द्यायची याची तयारी, कपडे बदलणे, हूडीचा वापर, स्कूटरचा वापर आणि घटनास्थळाची पूर्वतयारी यांसारखे मुद्देही समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा प्रकार अचानक घडलेला नसून, दीर्घकाळ नियोजन करून राबविण्यात आल्याचा संशय बळावला आहे.

पासपोर्ट गायब... संशयाची नवी दिशा

तपासादरम्यान बाली दौऱ्यापूर्वी केतनचा पासपोर्ट रहस्यमयरीत्या गायब झाल्याचाही मुद्दा समोर आला. हा पासपोर्ट जाणीवपूर्वक लपविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सियाच्या मोबाईलमधील माहिती, कुटुंबीयांच्या जबाबांतील विसंगती आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.

न्यायाच्या प्रतीक्षेत अग्रवाल कुटुंब

केतन अग्रवाल हे पुण्यातील 'सक्सेस ग्रुप' या रिअल इस्टेट समूहाशी संबंधित होते. त्यांचे लग्न काही महिन्यांवर आले असताना त्यांचा मृत्यू झाल्याने अग्रवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. न्यायाच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी मोर्चाही काढला. या प्रकरणात कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

तपास अंतिम टप्प्याकडे

सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात असून, फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल पुरावे, घटनास्थळाचे पुनर्निर्माण आणि इतर तांत्रिक तपास सुरू आहे. या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे—डिजिटल युगात कितीही काळजीपूर्वक आखलेला कट असला, तरी सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स आणि वैज्ञानिक तपासाच्या जाळ्यातून सुटका करणे अत्यंत कठीण आहे. केतन अग्रवाल हत्येचा तपास अद्याप सुरू असून, अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, गेल्या एका महिन्यात या प्रकरणाने प्रेम, विश्वासघात आणि गुन्हेगारी मानसिकतेचे भयावह वास्तव समाजासमोर उभे केले आहे.

Ketan Agarwal Murder Case
Sinhagad Road Flood: सिंहगड रस्ता वारंवार पाण्याखाली जाण्यामागे नदीपात्रातील अतिक्रमणे; जलसंपदा विभागाचा दावा

केतन अग्रवाल खुनातील धक्कादायक खुलासे

▪ एंगेजमेंट झाल्यानंतरही सिया आणि चेतन यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते.

▪ केतनला लोहागड किल्ल्यावर वारंवार नेण्यात आल्याचा तपासातील दावा.

▪ ३१ मे आणि १४ जून रोजी खुनाचे प्रयत्न फसल्याचा संशय.

▪ १४ जून रोजी केतनने झुडूप पकडल्याने जीव वाचल्याची चर्चा.

▪ बाली दौऱ्यापूर्वी केतनचा पासपोर्ट गायब झाल्याचा आरोप.

▪ घटनास्थळी जाण्यासाठी चेतनने टोल कॅमेरे टाळण्याचा प्रयत्न केल्याचा तपासातील दावा.

▪ मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्समुळे तपासाला दिशा मिळाली.

▪ आरोपींनी चॅट्स डिलीट केल्याचा संशय; फॉरेन्सिक तपास सुरू.

▪ अटकेनंतर दोघांनी एकमेकांवर दोषारोप केल्याची माहिती.

▪ सुरुवातीला अपघात वाटलेली घटना पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांचा दावा.

▪ सिया चेतनने गुपचूप लग्न केल्याची ही चर्चा

प्रेमकथा ते खून प्रकरण

  • ऑक्टोबर २०२५: सिया आणि चेतन यांच्यात कथित जवळीक वाढल्याचा तपासातील दावा.

  • फेब्रुवारी २०२६: केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांची एंगेजमेंट .

  • ३१ मे २०२६: लोहागडवर पहिला कथित प्रयत्न फसल्याचा संशय.

  • ६ जून २०२६: बाली ट्रिपपूर्वी केतनचा पासपोर्ट गायब.

  • १४ जून २०२६: दुसरा कथित प्रयत्न; केतनचा जीव थोडक्यात बचावल्याची चर्चा.

  • १७ जून २०२६: सिया आणि चेतनची पुण्यातील कॅफेमध्ये भेट; अंतिम नियोजन झाल्याचा तपासातील दावा.

  • १८ जून २०२६: लोहागड किल्ल्यावर केतनचा मृत्यू; सुरुवातीला अपघाताचा दावा.

  • १९ ते २२ जून २०२६: पोलिसांकडून तांत्रिक आणि डिजिटल तपासाला वेग.

  • २३ जून २०२६: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक.

  • जुलै २०२६: फॉरेन्सिक तपास, क्राइम सीन रिक्रिएशन आणि पुढील चौकशी सुरू.

केतन अग्रवाल?

  • वय : २५-२६ वर्षे

  • व्यवसाय : रिअल इस्टेट उद्योजक

  • सियाचा होणारा पती

  • पद: सक्सेस ग्रुपचे संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी

  • निवास: पुणे

सिया गोयल?

  • वय: २० वर्षे

  • शिक्षण: महाविद्यालयीन शिक्षण सुरू

  • तपासातील भूमिका: खुनाच्या कटात सहभागाचा आरोप

  • सद्यस्थिती: न्यायालयीन कोठडीत

चेतन चौधरी?

  • वय : २२ वर्षे

  • राहणार : राजस्थान

  • सियाशी प्रेमसंबंध

  • तपासातील भूमिका : प्रत्यक्ष खून केल्याचा आरोप

  • सद्यस्थिती : न्यायालयीन कोठडीत

'परफेक्ट मर्डर'चा फज्जा

मोबाईल फोन, सीसीटीव्ही, टोल नोंदी, लोकेशन ट्रॅकिंग, डिजिटल फॉरेन्सिक आणि कॉल डिटेल रेकॉर्ड या आधुनिक तपास यंत्रणांमुळे लोहागड हत्याकांडातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा करण्यात येत आहे. गुन्हा कितीही नियोजनपूर्वक केला तरी तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून सुटका करणे कठीण असल्याचे या प्रकरणाने पुन्हा अधोरेखित केले आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास वेगाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news