

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील दाभाडेमळा परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील उसाच्या शेतात शुक्रवारी (दि. 21) दुपारी एका बिबट मादीसह तिचे तीन बछडे दिसल्याने परिसरातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. शाळेजवळच बिबट्यांचा वावर असल्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
शेतकरी दामोदर दाभाडे यांनी सांगितले की, बटाटा पिकाच्या शेतात पाणी सोडत असताना त्यांना उसाच्या शेताच्या बाजूला बिबट मादीसह बछडे दिसली. त्यावेळी मजुरांसह शेतात काम करणाऱ्या इतर व्यक्तींमध्ये भीती पसरली. त्यानंतर शाळेपासून काही अंतरावर शेतकरी अंकुश महादू दाभाडे हे उसाच्या शेताला पाणी देण्यासाठी गेले असता, लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक डरकाळी फोडली. भयभीत झालेल्या दाभाडेंनी प्रसंगावधान राखत स्वतःला वाचवत तेथून ते बाहेर पडले.
बिबट मादीसह बछड्यांमुळे परिसरात धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचे, विशेषत: लहान मुलांचे बाहेर फिरणे अवघड बनले आहे. घटनास्थळी वनरक्षक लहू केसकर यांनी पाहणी केली असून दोन्ही ठिकाणी तत्काळ पिंजरे लावण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दाभाडेमळा शाळेच्या परिसरात तीन बछड्यांसह बिबट मादीचे दर्शन झाल्याची बातमी पसरताच गावातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकांना आवाहन केले आहे की, शाळेत ये-जा करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच, घरी जाताना मुलांनी एकट्याने न येता एकत्र येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आंबळेतील थरारक प्रसंग; त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
न्हावरे : आंबळे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सकाळचा नेहमीप्रमाणे शालेय परिपाठ सुरू असताना शाळेपासून काही अंतरावर शेतात बिबट्याचे दर्शन झाले. शिक्षकांनी त्वरित प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना वर्गात बसवले. या थरारक प्रसंगानंतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भयंकर भीती निर्माण झाली आहे.
गुरूवारी (दि. 20) सकाळी परिपाठ सुरू असतानाच शिक्षिका रेखा लंघे यांना शाळेपासून सुमारे 100 ते 150 फूट अंतरावर बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ मुख्याध्यापक जालिंदर दुर्गे यांना माहिती दिली. दुर्गे यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बेंद्रे यांना कळवले. बेंद्रे यांनी वनखात्याला सूचित केल्याने वनखात्याचे कर्मचारी शाळेला त्वरित भेट देऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.
आंबळे परिसरात बिबट्यांची संख्या वाढल्याने नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी आणि महिलांमध्ये सतत भय निर्माण झाले आहे. सरपंच सोमनाथ बेंद्रे आणि तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष अण्णा बेंद्रे यांनी वनखात्याने बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी केली; अन्यथा ग्रामस्थ तीव आंदोलन करू शकतात, असा इशारा दिला.