

ज्येष्ठ राजकारणी, काँग्रेसचे निष्ठावंत नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, ही आहे गोपाळ तिवारी यांची ओळख. गोपाळदादा म्हणून ते सामाजिक, राजकीय वर्तुळात सुपरिचित. नारायण-सदाशिव, नवी पेठ परिसराचा समावेश असणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी प्रभागातून काँग्रेसच्या तिकिटावर उच्चांकी मताधिक्याने निवडून येणाऱ्या गोपाळदादांच्या आठवणीत राहिला तो याच प्रभागातून 1997 च्या निवडणुकीतील झालेला पराभव. अवघ्या 14 मतांनी झालेल्या या पराभवाने त्यांच्या उंचावत चाललेल्या राजकीय झेपेलाच वेसण घातली गेली... या पराभवाची कहानी त्यांच्याच शब्दात...
गोपाळ तिवारी
काँग्रेसचे नेते सीताराम केसरी 1983 मध्ये पुण्यात येणार होते. त्यांचे जोरदार स्वागत व्हायला हवे, या गुरुदास कामत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी 25-30 कार्यकर्त्यांसह विमानतळावर पोहोचलो. केसरी यांच्या जंगी स्वागताने आमचे दैवत असलेले काँग्रेसचे नेते गुरुदास कामतही चांगलेच सुखावले. एक धडाडीचा युवा कार्यकर्ता म्हणून ते मला ओळखू लागले. त्यामुळेच 1985 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर युवक काँग्रेसच्या पाच पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये माझेही नाव आघाडीवर होते. मात्र तुल्यबळ लढत देऊनही, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले शिवाजीराव मावळे या वॉर्डातून अपक्ष म्हणून निवडून आले. भाजपचे जुने-जाणते व अनुभवी नेते शिवाजीराव आढाव यांच्यासह मलाही तेव्हा पराभवाचा सामना करावा लागला.
महापालिकेची निवडणूक मी पहिल्यांदाच लढवत होतो. फारसा अनुभवही नव्हता, त्यामुळे खचून न जाता, गणेशोत्सव मंडळ आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी काम करीत राहिलो. माझी धडाडी पाहून काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठलराव लडकत यांच्या कमिटीत मला सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली, तोपर्यंत 1992 ची निवडणूक आली. या वेळी निवडणुकीपूर्वी अवघे 6 महिने आधी काँग्रेसमध्ये आलेल्या शिवाजीराव मावळे यांना पक्षाने शिक्षण मंडळ अध्यक्षपद दिले, इतकेच नव्हे तर महापालिकेची उमेदवारीही दिली. स्वाभाविकच पक्षाने माझी संधी हिरावून घेतली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करू लागले. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय मी घेतला आणि ज्या प्रभागातून पराभूत झालो होतो त्याच प्रभागातून चांगल्या मताधिक्याने निवडूनही आलो. पक्षाने संधी नाकारली तरी मूळ काँग्रेसचा असल्याने पुन्हा महापालिकेत काँग्रेस पक्षाचा सहयोगी सभासद झालो..! 1992 च्या या विजयाने मला खूप काही दिले. हा विजय माझा आत्मविश्वास दुणावणारा व माझ्या कार्यकर्तृत्वास वाव देणारा ठरला..!
नगरसेवकपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दूरगामी परिणाम करणारी अनेक लोकोपयोगी कामे मला करता आली. त्यावेळी विद्यार्थी संख्येअभावी नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशाला बंद करून तेथे महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला होता. विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा प्रस्ताव मी पुढाकार घेत हाणून पाडला. त्यामुळे या जागी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसऐवजी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी विद्यानिकेतन क्र. 7 ची शाळा सुरू करण्यात आली. लकडी पूल (संभाजी पूल) ते नवा पूल (शिवाजी पूल) दरम्यान नदी पात्रात असलेल्या पर्यायी रस्त्याची मुहूर्तमेढ करण्यात व नंतर प्रत्यक्ष रस्ता बांधण्याच्या कामातही सिंहाचा वाटा होता. मुठा नदीवरील डेक्कन जिमखान्याला जोडणारा ‘भिडे पुला’ची योजना व त्याची मुहूर्तमेढही माझ्याच कारकिर्दीत झाली. कचरा गोळा करण्यासाठी फिरत्या घंटागाड्या सुरू करण्याच्या निर्णयात मी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अशा विविध विकासकामांनी भरगच्च भरलेले प्रगतीपुस्तक घेऊन 1997 च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मी सज्ज झालो होतो. ज्ञानप्रबोधिनी वॉर्डमधून (नारायण- सदाशिव पेठ) काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून पक्षाने मला पुन्हा संधी दिली. परिसर व प्रभागाच्या विकासाबरोबरच शहराच्या मूलभूत व धोरणात्मक विषयांवर मी बोलत होतो, आग्रही भूमिका घेत होतो व त्याला जनमाणसात चांगला प्रतिसाद मिळत होता. सारस बागेचा प्रश्न, गरवारे बालभवन येथील ‘क्रीडांगण झोन उठवून व्यापारी झोन’ करणे व तेथील रोपवे-सह व्यावसायिक संकुल उभारणेबाबतच्या प्रस्तावावर मी भाष्य करीत होतो. माझी भूमिका पर्यावरण व नागरी हिताची होती. नगरसेवक म्हणून पाच वर्षांत केलेल्या कामाचा, प्रभागात असलेल्या संपर्काचा चांगला प्रतिसाद मला घराघरांतून मिळत होता. मात्र, माझी ही घोडदौड विरोधी पक्षातील काहींना तसेच काही स्वपक्षीयांना त्रासदायक वाटत असावी. काही राजकीय धुरीणांनी माझ्याविरोधात वेगळीच खेळी रचण्यास सुरुवात केली. अर्थात ही चाल समजण्यास मला खूपच उशीर झाला. मी करीत असलेली विकासकामे व माझी वाढती लोकप्रियता त्यांच्या डोळ्यावर आली होती. माझ्या वॉर्डातील माझी मते फोडण्यासाठी विरोधकांनी बरेच पुरस्कृत उमेदवार उभे केले. परिणामी माझ्या मतांचे विभाजन झाले.
मला पाडण्यासाठी विरोधक आपापसातील राजकीय मतभेद विसरून एक झाले. रात्री-अपरात्री त्यांच्या बैठका सुरू झाल्या. माझ्या वॉर्डात तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते, तरीही 18 उमेदवारांच्या या भाऊगर्दीत मी 2093 मते मिळविली. माझ्या विरुद्ध उभे असलेले भाजपचे उमेदवार प्रा. विकास मठकरी हे 2107 मते मिळवून विजयी झाले. त्यावेळी विविध वाडे-वस्त्यांतील विविध जाती-धर्माच्या अपक्ष उमेदवारांनी तब्बल 1000 मते खाल्ली होती. नाम-साधर्मतेचा फायदा उठविण्यासाठी विरोधकांनी देवेंद्र तिवारी या नावाच्या उमेदवारासही उभे केले, मात्र जागरूक नागरिकांनी त्याला मते दिली नाहीत. त्यांना फक्त 3 मते मिळाली. अवघ्या 14 मतांनी झालेला हा पराभव माझ्या चांगलाच जिव्हारी लागला. निवडणूक झाल्यानंतर मी आभाराची जाहिरात दिली आणि त्यात सर्व उमेदवारांच्या मतांची चौकटही दिली. त्यातील एका उमेदवारापुढे कंसात ‘पुणे फेस्टिव्हलचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे स्वपक्षीयांपैकी कुणी घात केला असेल, ते वेगळे सांगण्याची गरज नाही.
नारायण-सदाशिव-नवी पेठेतून ‘काँग्रेस पक्षाचा उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येण्याची दाट शक्यता असताना’ काहींनी रचलेल्या या कुटिलतेमुळे अघटित घडले. त्यामुळेच ही निवडणूक माझ्या कार्यकर्तृत्वास वेसण घालणारी ठरली, असे मला वाटते.
नारायण- सदाशिव पेठेतील निष्ठावान काँग्रेस उमेदवाराचा राजकीय चक्रव्यूहातून झालेला हा पराभव, माझ्या वेगवान कार्यकर्तृत्वास खीळ घालणारा ठरला असे म्हणणे वावगे ठरणार नाही! दुसऱ्या टर्ममध्ये निवडून आलो असतो.. तर पुढे ‘स्थायी समिती अध्यक्षपद, उपमहापौर, महापौर इत्यादी संधीद्वारे माझी राजकीय कारकिर्द आणखी उंचावली असती व त्या संधीचे सोने करू शकलो असतो, असे मला सतत वाटते.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)