PMC Voter List Issue: महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ!
पुणे : महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर पहिल्याच दिवशी अनेकांनी आक्षेप नोंदवला. अनेकांची नावे वगळून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्या. तर मतदार याद्यांची योग्य पद्धतीने फोड करण्यात आली नाही, यासह पैसे भरूनही इच्छुकांना प्रारूप मतदार याद्या मिळाल्या नाहीत, यांसारख्या 52 तक्रारी निवडणूक विभाग व क्षेत्रीय कार्यालयांना मिळाल्या.
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या गुरुवारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आल्या. तसेच या याद्या इच्छुकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या याद्या ऑनलाइनदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे समोर आले आहे. या मतदार याद्या योग्य पद्धतीने तोडल्या गेल्या नाहीत. प्रभागाच्या सीमा पाळल्या गेल्या नाहीत. तसेच या याद्या फोडताना प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्या नाहीत. केवळ कागदोपत्री कामे उरकून याद्या तयार करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी केले आहेत.
याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “मतदार याद्यांमध्ये अव्यवस्था माजली आहे. आपल्या प्रभागाच्या मध्य भागातील नावे शेजारच्या प्रभागात टाकली आहेत. हे जाणूनबुजून केले गेले आहे. निवडणुकीचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याने प्रत्येकाने मतदार याद्यांचे बारकाईने परीक्षण करणे अत्यावश्यक आहे.” तर माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत म्हटले, “महापालिकेतील काही सहाय्यक आयुक्तांना पुण्याच्या भूगोलाचीच माहिती नाही. प्रभागरचनेनुसार याद्या तयारच झालेल्या नाहीत. यामागे मोठे षड्यंत्र आहे. याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लढा देणार.”
हरकती सादर करण्याची मुदत वाढवावी
प्रारूप मतदार यादीसाठी ठरावीक शुल्क भरूनही दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) अनेक उमेदवारांना याद्या न मिळाल्याने संताप आहे. सत्ताधारी पक्षाला लाभ मिळवून देण्यासाठी हे षड्यंत्र रचले गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे हरकती सादर करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे.

