

निनाद देशमुख
पुणे : शहर आणि उपनगरांतील अनेक छोटी-मोठी रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब तसेच क्लिनिक्सने बायोवेस्ट उचलण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंद केली नसून, हा कचरा थेट शहरा बाहेर टाकला जात आहे. हा धोकादायक कचरा उघड्यावर रिचवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्यात येत आहे. महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी थेट शहराबाहेर हा कचरा टाकला जात आहे.
कात्रजच्या जुन्या व नवीन घाटात मेडिकल वेस्ट फेकला जात असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने दिले होते. या प्रकरणाचा मागोवा घेतला असता शहरातील व उपनगरातील अनेक दवाखाने व पॅथॉलॉजी लॅब तसेच क्लिनिक्स बायोवेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदच करत नसल्याचे वास्तव समोर आले. पुणे शहरात 850 खासगी दवाखाने व रुग्णालये तसेच पालिकेचे 70 रुग्णालये आहेत. या सर्व दवाखान्यांचा मेडिकल वेस्ट हा पॉस्को या खासगी कंपनीमार्फत उचलला जातो. शहरात रोज 8 ते 9 टन मेडिकल वेस्टचा कचरा निघतो. हा कचरा कैलास स्मशानभूमीत महापालिकेच्या इन्सिनरेटर येथे पाठवून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.
मात्र, शहरात व उपनगरात अनेक छोटे व मोठे दवाखाने आहेत. तसेच समाविष्ट 23 गावांतील अनेक दवाखाने मनपाच्या हद्दीत नव्याने दाखल झाले आहेत. या लहान दवाखान्यांची नोंद अतिशय कमी प्रमाणात आहे. हजारोंच्या संख्येत असणाऱ्या लहान-मोठ्या दवाखान्यांची नोंद आरोग्य विभागाकडे नसल्याचे मनपाकडून प्राप्त माहितीवरून समोर आले आहे. रुग्णालयांची पालिकेकडे नोंदणी करण्यासाठी आल्यास बायोमेडिकल वेस्टसाठी नोंदणी करणे बंधनकारक असते. मात्र, अनेक लहान दवाखाने पालिकेकडे बायोमेडिकल वेस्टसाठी नोंदच करत नाहीत. त्यांच्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई सुद्धा होत नाही. त्यांचा हा कचरा थेट उघड्यावर टाकला जात आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणात खासगी व सरकारी रुग्णालये आहेत. या दवाखान्यातून रोज 8 ते 9 टन वैद्यकीय कचरा (बायोवेस्ट) तयार होतो, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
अनेक घरात विविध आजाराने ग्रस्त रुग्ण असतात. त्यांच्यावर घरीच उपचार केले जातात. आजारी माणसांचे डायपर, इंजेक्शनच्या सुया, सलाइनच्या बाटल्या या थेट घरी येणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीकडे दिल्या जातात. हा कचरा वेगळा केला जात नसल्याने कचरा गोळा करणाऱ्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते.
बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोस्को नामक कंपनीला तब्बल 30 वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. या कंपनीच्या गाड्या दवाखान्यात जाऊन कचरा गोळा करतात व मनपाच्या इन्सिनरेटर येथे विल्हेवाट लावण्यासाठी नेतात. तेथे त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यासाठी संबंधित रुग्णालय किंवा पॅथालॉजी लॅबकडून पालिका ठरावीक रक्कम घेते.
बायोवेस्ट तयार करण्यासाठी महापलिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंद करावी लागते. कचरा गोळा करण्यासाठी नोंदणी करणाऱ्या दवाखान्याकडून वर्षांचे 3 हजार 500 रुपये घेतले जातात. यानंतर कचरा गोळा करणारी गाडी थेट नोंदणी केलेल्या दवाखण्यात जाऊन हा कचरा गोळा करून ईन्सिनरेट येथे घेऊन जातात. यानंतर या काचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.
शहरात मोठ्या प्रमाणात बायोवेस्ट तयार होतो. बायोवेस्ट उचलण्याचे कंत्राट पॉस्को या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीमार्फत हा कचरा गोळा करून त्याची महापलिकेच्या इन्सिनरेट येथे नेला जातो. शहरात ज्या दवाखान्यांनी बायो वेस्ट उचलण्यासाठी मनपाकडे नोंद केली नाही, त्यांनी तातडीने नोंद करावी. बायोवेस्ट उघड्यावर टाकल्यास थेट कारवाई करण्यात येईल.
सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका