

पुणे: देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सध्या सुमारे 15 कोटींवर पोहोचली असून, 2050 पर्यंत हा आकडा सुमारे 32 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. वाढत्या वयातील आरोग्य, एकटेपणा आणि दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी सरकारी व्यवस्था अपुरी ठरत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचा कल आता रुग्णालये किंवा वृद्धाश्रमाऐवजी घरपोच आरोग्यसेवा आणि निगेकडे वाढताना दिसत आहे.
ज्येष्ठ नागरिक निगा क्षेत्रातील तज्ज्ञ, असोसिएशन ऑफ सिनियर लिव्हिंग इंडिया स्थापनेत पुढाकार घेणारे तसेच ’ईमोहा’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्यजित रॉय यांच्या संशोधनातून हा कल स्पष्ट झाला आहे. त्यांच्या मते, आयुष्याच्या अखेरीस वृद्धाश्रम किंवा रुग्णालयात दिवस काढण्याऐवजी कुटुंबीयांसमवेत, परिचित वातावरणात राहण्याची वृद्धांची इच्छा वाढत आहे. त्यामुळे घरच्या घरी वैद्यकीय शुश्रूषा, नियमित तपासण्या, तातडीची मदत आणि इतर सहाय्यक सेवांना प्राधान्य दिले जात आहे. नीती आयोगाच्या 2024 च्या अहवालानुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यसेवेशी संबंधित अर्थव्यवस्थेचा जागतिक आकार सुमारे 7 अब्ज डॉलर्स (630 अब्ज रुपये) इतका आहे. भारतातील या ’सिल्व्हर इकॉनॉमी’चा आकार सध्या सुमारे 3 अब्ज डॉलर्स असून, तो वेगाने वाढणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न ’पॉप्युलेशन फंड इंडिया’च्या माहितीनुसार 2050 पर्यंत देशातील सुमारे 20 टक्के लोकसंख्या ज्येष्ठांची असेल. 2045 नंतर तरुण लोकसंख्येपेक्षा ज्येष्ठांची संख्या अधिक होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
रॉय म्हणतात, आपण प्रामुख्याने मुलांच्या संगोपनावर चर्चा करतो, मात्र घरातील ज्येष्ठांच्या गरजा दुर्लक्षित राहतात. वृद्धांच्या काळजीत केवळ उपचार नव्हे, तर त्यांच्या इच्छा, जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि आनंद यांचाही समावेश असायला हवा. तातडीची वैद्यकीय मदत, नियमित तपासणी, गरज पडल्यास रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया, घरगुती साहाय्य, तसेच पर्यटनासह विविध सेवा वृद्धांना अपेक्षित आहेत.
‘ईमोहा’ 200 शहरात सक्रिय
कोरोना महामारीनंतर घरपोच सेवांची गरज अधिक ठळक झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर ’ईमोहा’ या स्टार्टअपने पुण्यात प्रवेश केला आहे. शहरातील विविध रुग्णालये या सेवांसाठी करार करत असून, ॲपच्या माध्यमातून कुटुंबीय घरातील ज्येष्ठांच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ संदेश जाण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. सध्या ’ईमोहा’चे देशभरातील सुमारे 200 शहरांत कामकाज सुरू आहे.
ज्येष्ठांसाठी मिळेना मजबूत सपोर्ट सिस्टीम
आपल्या देशात वृद्धांसाठी मजबूत सपोर्ट सिस्टीम नाही. अमेरिकेतील 911सारखी सर्वसमावेशक आपत्कालीन सेवा किंवा सातत्यपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे वृद्धांचे दैनंदिन आयुष्य सुलभ होईल, त्यांच्या आनंदात आणि जीवनमानात सुधारणा होईल, अशा सेवांची आज नितांत गरज आहे, असे सौम्यजित रॉय यांनी नमूद केले. सध्या देशात खास ज्येष्ठांसाठी असणाऱ्या निवासी सुविधांची संख्या सुमारे 8 हजारांच्या आसपास असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील वृद्धांची गरज
पुणे शहर हे आयटी हब असल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण व्यावसायिक परदेशात किंवा इतर शहरांत स्थलांतरित झाले आहेत. परिणामी अनेक वृद्ध आई-वडील शहरात एकटे किंवा न्यूक्लिअर कुटुंबांत राहतात. शहरात सुमारे 10 लाख ज्येष्ठ नागरिक असून, त्यातील मोठा वर्ग रुग्णालयांपेक्षा घरी उपलब्ध होणाऱ्या आरोग्यसेवांना पसंती देत आहे.