साहेबराव लोखंडे
टाकळी हाजी: शिरूर तालुक्यातील ग््राामीण भागात बिबट-मानव संघर्ष दिवसेंदिवस तीव होत चालला आहे. पिंपरखेड, जांबुत, टाकळी हाजी, कवठे येमाई, माळवाडीबरोबरच बेट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. पाळीव जनावरे, पशुधन आणि लहान मुले आणि महिलांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. (Latest Pune News)
टॉर्च, काठी आणि गाण्यांच्या सूचना वास्तवापासून दूर
वन विभागाने सांगितलेल्या उपायांमध्ये रात्री टॉर्च वापरणे, गाण्यांचा आवाज करणे, हातात काठी ठेवणे यांचा समावेश आहे. मात्र, शेतकऱ्यांनी “हातात काठी घेऊन शेतात काम कसे करायचे? दिवसा शेतात काम करताना काय करायचे? या सूचना फक्त कागदावरील उपाय आहेत. प्रत्यक्षात ग््राामीण वास्तव, शेतमजुरीची पद्धत सूचना करताना लक्षात घेतलेली नाही.
जंगलात फक्त बिबटेच आहेत का?
जंगलात सिंह, तरस, रानगवे, कोल्हे, हरीण असे सर्व प्राणी आहेत. जंगल कमी झाल्याने बिबटे गावाकडे आले, असे म्हणणाऱ्यांना एक प्रश्न विचारला जात आहे, की फक्त बिबटेच गावात का वाढले? असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. त्यांचा आरोप आहे की, वन विभागाने बिबट्यांच्या प्रजननाला प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजना केल्या. मात्र, नुकसान आणि दोष मात्र शेतकऱ्यांवरच टाकला जातो.
कंपाउंड निरुपयोगी
शेतकऱ्यांनी घराभोवती कंपाउंड बांधले तरी बिबट्या दहा फूट उंच भिंती ओलांडून आत शिरतो. टाकळी हाजी आणि जांबुत येथील काही शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्ही कंपाउंड केले; पण बिबट्याने रात्री त्याचे सहज उल्लंघन केले. मग उपाय काय?
धनगर समाजाची वेगळीच कसरत
रानात मेंढ्यांसह फिरणाऱ्या धनगर समाजाला दररोज वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकावा लागतो. दररोज कुंपण कसे घालायचे? रोज सुरक्षाव्यवस्था कशी करायची? असे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत. धनगर समाजातील काही कुटुंबांनी तर रात्रीच्या वेळी मेंढ्या एका ठिकाणी एकवटणेच बंद केले आहे. कारण, बिबट्यांच्या हल्ल्यामुळे त्यांना वारंवार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. वन्यजीवांचे संरक्षण आम्हालाही मान्य आहे. पण, माणसांच्या जिवाचा प्रश्न दुर्लक्षित कसा? असा प्रश्न आता ग््राामस्थांनी शासनाला केला आहे.
शेतकऱ्यांचे जीवनच बदलले
बिबट्यांच्या भीतीमुळे ग््राामीण जीवन पूर्णपणे बदलले आहे. रात्री शेतावर जाणे बंद झाले. शेतात खेळणारी मुले घरातच राहतात. अनेक खेळ नामशेष झाले आहेत. गावोगावी रात्रीची शांतता आता भीतीची शांतता बनली आहे. काही पालकांनी तर या भागात मुलींचे लग्न लावायलाही कचरायला सुरुवात केली आहे.
मग शेती कशी करायची?
वन विभागाने “घरांना कंपाउड करा, गटाने काम करा, टॉर्च वापरा, ऊसक्षेत्र कमी करा...” अशा सूचना दिल्या असल्या; तरी या उपाययोजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वास्तवाशी विसंगत ठरत आहेत. वन विभाग म्हणते वाकून काम करू नका. पण, शेती उभी राहून कशी करणार? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. औषध फवारणी, गवत काढणे, पाणी देणे, रोपांची निगा राखणे आदी सर्व कामांसाठी वाकावेच लागते. अशा सूचना देणाऱ्यांना शेतीचे काम समजते का? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. स्त्रिया, वयोवृद्ध मंडळी आणि लहान मुलेही शेतात मदत करीत असतात. “गटाने काम करा” ही सूचना शेतकऱ्यांना व्यवहार्य वाटत नाही. कारण, प्रत्येक घरातील सदस्यांचे वेळापत्रक वेगळे आणि शेतात काम करण्यासाठी पुरेसे लोकही नसतात. सर्वजण एकच वेळी एक काम करतील, असे नाही.
आम्ही निसर्गाचे शत्रू नाही!
आम्ही निसर्गाशी लढत नाही, निसर्गासोबत जगतो. पण, आमच्या लेकरांचा जीव वाचवा! जसे बिबटे जगले पाहिजेत तसे आम्हीही जगलो पाहिजे! गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासन आणि वन विभागाने फक्त सूचना न देता, प्रत्यक्ष कार्यवाही आणि उपाययोजना राबवाव्यात. कारण, शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे, जर तोच भीतीने वाकला, तर देशाचाच कणा वाकेल.