

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणीनगर-वडगाव शेरी प्रभागामध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. भाजपने पुन्हा विजय मिळविण्याच्या दृष्टीने प्रभागाची रचना केल्याचा आरोप सर्व पक्षांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे दोन गट झाले. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा वडगाव शेरीमध्ये भाजप झेंडा फडकवणार का? किंवा भाजपचा विजयरथ राष्ट्रवादी रोखणार का? याबाबत उत्सुकता आहे. (Latest Pune News)
आगामी महापालिका निवडणुकीसाठी कल्याणीनगर-वडगाव शेरी या प्रभाग क्र. ५ ची एकूण लोकसंख्या ९१ हजार ३८१ आहे. २०१७ मध्ये वडगाव शेरीतील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गणेशनगर भाग दोन प्रभागात तोडला होता. मात्र, आता पुन्हा नव्या रचनेमध्ये गणेशनगर, शास्त्रीनगर, त्रिदलनगर आणि म. हौ. बोर्डचा हा भाग वडगाव शेरीमध्ये जोडला आहे. त्यामुळे पुन्हा 'भाजपचे माजी नगरसेवक संदीप जन्हाड विरुद्ध सचिन भगत' अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे.
नगरसेवक योगेश मुळीक यांनी या प्रभागातून दोनदा विजय मिळविला आहे. या वेळी ते हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत. योगेश मुळीक आणि राष्ट्रवादी कहीसचे नारायण गलांडे यांच्यामध्ये चुरशीची आणि अटीतटीची लढत होते. पण, यावर्षी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युत्ती आहे. युती झाल्यास पहिल्यांदा योगेश मुळीक आणि नारायण गलांडे एकमेकांविरोधात नसतील, अशी चर्चा आहे. सर्वसाधारण पुरुषमध्ये शिवसेना शिंदे गटातून उद्धव गलांडे, शिवसेना उद्धव गटातून अॅड. सतीश मुळीक, शिवाजी वडघुले, राष्ट्रवादी शरद पवार गटातून विजय गलांडे, आशिष माने, काँग्रेस पक्षाकडून प्रमोद देवकर, करीम शेख, असे अनेक जण इच्छुक आहेत.
वडगाव शेरी प्रभागामध्ये २०१७ मध्ये तीन सर्वसाधारण जागा आणि एक ओबीसी महिला जागेचे आरक्षण होते. माजी नगरसेविका कै. शीतल शिंदे ह्या सर्वसाधारण महिला जागेवरून निवडून आल्या होत्या. कै. शिंदे यांचे वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या जागी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपमधील सारिका दळवी, कविता गलांडे, ज्योत्स्ना गवारे, तृप्ती देवकर, श्वेता गलांडे ह्या निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातून मनीषा देवकर ह्या तयारी करीत आहेत. शरद पवार राष्ट्रवादी गटातून नीता गलांडे इच्छुक आहेत.
नगरसेविका कै. शीतल शिंदे यांचे पती माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे हे उमेदवारी मागत होते. शीतल शिंदे यांच्या रिक्त जागेवर अनेक इच्छुक महिला दावा करीत होत्या. त्याप्रमाणे तयारी सुरू केली होती. पण, काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर शिंदे यांनी पुन्हा लग्न केले आहे. यामुळे सौ. शिंदे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यांच्या लग्नामुळे राजकीय समीकरण पुन्हा बदलले.
या प्रभागामध्ये सुनीता गलांडे ह्या तीनवेळा निवडून आल्या आहेत. गलांडे यांनी मागील निवडणुकीत ओबीसी महिला प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. काँग्रेस पक्षाकडून अश्विनी उकरंडे इच्छुक आहेत. पण, यंदा अनेकांनी कुणबी दाखले काढवल्याने सर्वच पक्षांतून ओबीसी प्रवर्गात सर्वाधिक इच्छुक असणार आहेत. आरक्षण कसे पडते, यावरून सर्व उमेदवार त्यांची दिशा ठरविणार आहेत.
भाजप
माजी नगरसेवक योगेश मुळीक, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, माजी नगरसेवक संदीप जन्हाड, माजी नगरसेविका सुनीता गलांडे, कविता गलांडे, महेंद्र गलांडे, गणेश गवारे, ज्योत्स्ना गवारे, सारिका दळवी, राहुल दळवी, तृप्ती देवकर
राष्ट्रवादी शरद पवार गट
आशिष माने, विजय गलांडे, नीता गलांडे, जावेद हुसेन शेख, विजय खडके
काँग्रेस पक्ष
प्रमोद देवकर, करीम शेख, अश्विनी उकरंडे
राष्ट्रवादी अजित पवार गट
नारायण गलांडे, मनीषा देवकर, मीनल सरवदे, मनोज पाचपुते
शिवसेना उद्धव ठाकरे गट
माजी नगरसेवक सचिन भगत, अॅड. सतीश मुळीक, शिवाजी वडघुले
शिवसेना शिंदे गट
उद्धव रवींद्र गलांडे