

वाडा : वाळद (ता. खेड) येथील पुशपालक रामदास नामदेव पोखरकर यांच्या दुभत्या जर्सी गायीवर बिबट्याने हल्ला केल्याने या गायीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये शेतकरी पोखरकर यांचे अंदाजे 1 लाख 25 हजारांचे नुकसान झाले.
वाळद व परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून, आजतागत अनेक पाळीव जनावरांसह भटक्या कुत्र्यांच्या बिबट्याने जीव घेतलेला आहे. दि. 6 नोव्हेंबर रोजी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पूर्ण वाढ झालेली 10 वर्षांची बिबट मादी जेरबंद झाली होती; मात्र या भागात अजूनही बिबटे असल्याने वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. येथे पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.
मागील 7 नोव्हेंबर रोजी रामदास पोखरकर यांच्या 5 वर्ष वयाच्या जर्सी गायीवर बिबट्याने हल्ला करून या गायीला गंभीर जखमी केले होते. वाडा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रेरणा मुळूक यांच्या माध्यमातून संबधित गायीवर उपचार सुरू होते; मात्र शनिवारी (दि. 22) या गायीचा मृत्यू झाला. वन विभागाने या भागात पिंजरे लावले असते, तर या शेतकऱ्याचे झालेले नुकसान टाळता आले असते, असे पशुपालक रामदास पोखरकर यांनी सांगितले.
या घटनेचा वनपरिमंडल अधिकारी डी. डी. फापाळे, वनरक्षक एस. वाय. आंबेकर, वनसेवक एस. एस. मुऱ्हे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संबंधित शेतकऱ्याला वन विभागाच्या वतीने भरपाई मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
लोणी-धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांदळेवाडी येथील कान्हूर मेसाई शिवेवर इझळ डोंगराजवळ राहणारे महादू बोत्रे हे रविवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराच्या पडवीत बसले होते. त्यांचा कुत्रा अंगणात बसलेला असताना अचानक बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला उचलून तुरीच्या शेतात ओढून नेले. ही घटना बोत्रे यांच्या नजरेसमोर घडल्याने ते प्रचंड घाबरले. ’कुत्रा आणि मी फक्त 10 फुटांवर होतो. घरापासून अवघ्या 400 फुटांवर उसाचे शेत आहे,’ असे बोत्रे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत झंझळ डोंगर, पिंपळवाडी रस्ता, ढगेवाडी, ढगेवस्ती, वडगावपीर या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. 15 दिवसांपूर्वी ढगेवस्ती (सविंदणे रस्ता) येथे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या मजुरांना बिबट्या दिसला. कान्होबा मंदिराजवळील बंगेवस्ती येथे शेळीवर हल्ला करून बिबट्याने तिचा फडशा पाडला. झंझळ डोंगर परिसरात शेतात काम करत असताना भाऊ बगाटे यांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले. तर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने ढगेवाडी येथे पिंजरा बसवला आहे.
भोर : भाटघर धरणाच्या बॅक वॉटर जवळील डेरे येथील इनामाच्या ओढ्याजवळ बिबट्या पाहिल्याचे शेतकरी जयवंत डोंबे यांनी सांगितले. जयवंत डोंबे हे रविवारी (दि. 23) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भात काढणीचे काम करून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांना बिबट्या दिसला. बिबट्याने चारचाकी वाहनाला धडक दिल्याचे डोंबे यांनी सांगितले. या भागात बिबट्याचा वावर वाढत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद डोंबे यांनी केली आहे.
यंदा पावसाची दमदार हजेरी झाल्याने परिसरातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेळ्या, मेंढ्या व जनावरे मोकाट चरायला नेत आहेत. मात्र बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी भयभीत झाले असून ’जनावरांचे रक्षण करायचे की स्वतःचे?’ असा प्रश्न निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करतात. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड सुरू झाल्याने बिबट्यांची दडण कमी होईल आणि तो डोंगरातील झाडा-झुडपांत स्थलांतर करू शकतो, असे स्थानिक सांगत आहेत.
शेतात काम करताना तसेच जनावरे चरायला नेताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. झंझळ डोंगर परिसरात पिंजरा बसवण्याची मागणी संतोष शिंदे (चेअरमन, विविध सहकारी सोसायटी), महादू बोत्रे, अजय बोत्रे व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तर वन विभागाशी संपर्क साधला असता, 2 दिवसांत अतिरिक्त पिंजरा बसवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.