

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना खडकीतील औंध रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला अटक केली. केतन वसंत जगताप (वय 35, रा. गोऱ्हे बुद्रुक, जगताप आळी, खडकवासला) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
आरोपीने केलेल्या हल्ल्यात पत्नी रितिका केतन जगताप (वय 29, रा. बाराथेवस्ती, औंध रस्ता, खडकी) ही जखमी झाली असून, तिने याबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी केतन याला अटक केली आहे.
आरोपी केतन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता. त्याच्या त्रासामुळे पत्नी औंध रस्ता परिसरात असलेल्या आपल्या माहेरी निघून आली होती. शनिवारी (22 नोव्हेंबर) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास केतन रितिकाला भेटण्यासाठी औंध रस्ता परिसरात गेला. टपाल कार्यालयासमोर बोलत असतानाच गाडीच्या डिक्कीतून आणलेला कोयता काढून फिर्यादीवर केतननेे वार केले.