

नारायणगाव: नारायणगाव येथील साकारनगरीजवळ असलेल्या पिराच्या वस्तीत राहत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा युवक बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला. दरम्यान या जखमी युवकावर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाला घटनेची माहिती मिळते त्यांनी युवक राहत असलेल्या वस्तीजवळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव तनिष नवनाथ परदेशी आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पीर वस्ती जवळ राहत असलेला हा युवक गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घराजवळ फिरत असताना बिबट्याने मागच्या बाजूने येऊन त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या मांडीला जखम दोन ठिकाणी झाली आहे.
दरम्यान बिबट्याचा हल्ला झाल्यावर हा युवक बिबटयाच्या भीतीने १०० मीटर अंतरावर असलेल्या गाजर गवतात जाऊन लपून बसला व त्याने आपल्या मित्राला फोन करून घटनेची माहिती सांगितली. मित्राला सुरुवातीला वाटले हा आपली मस्करी करतोय, परंतु त्याचा रडण्याचा आवाज आल्याने मित्र तातडीने त्याच्या घरी आला व आईला विचारले तनिष कुठे आहे? तो बाहेर आहे असे आईने सांगितले. मग मित्राने लगेच तनिषला फोन लावला व तू कुठे आहेस, असे विचारल्यावर घराच्या बाजूला आंब्याजवळ असलेल्या गाजर गवतात मी लपून बसलोय असे त्याने सांगितते. गाजरगवतामधून त्यांनी मोबाईलची बॅटरी लावली. मोबाईलचा टॉर्च लावल्यावर त्याचा मित्र त्या गाजर गवतात गेला व त्याला बाहेर आणले. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याला तातडीने नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान घटनेची माहिती समजतात तालुक्याचे आमदार शरद सोनवणे व नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी दवाखान्यात जाऊन या युवकाची विचारपूस केली. या युवकावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना आमदार शरद सोनवणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान तनिष परदेशी ज्या पीर वस्ती जवळ राहत आहे, त्या वस्तीजवळ चारी बाजूंनी ऊस आहे. त्यामुळे तेथे बिबट्याचे वास्तव्य अनेक दिवसापासून असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वन खात्याने या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावलाय, परंतु बिबट्या काही पिंजऱ्यात येत नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. पिंजरा पूर्णपणे उघडा व लोक वस्ती जवळ ठेवल्यामुळे त्याच्यात बिबट्या कसा येणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, या परिसरामध्ये बिबट्या असल्याचे स्थानिक नागरिकांनी आम्हाला सांगितल्यावर वनखात्याने तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे. वस्तीजवळ लावलेला पिंजरा स्थानिक नागरिकांच्या सुचनेनुसार दुसऱ्या सोयीच्या ठिकाणी लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.