

जुन्नर: जुन्नर तालुक्याच्या कृषिवैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तालुक्यातील बुचकेवाडी येथील प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ या विशेष आंब्याच्या वाणाला केंद्र शासनाकडून ‘शेतकरी जात’ (Farmers Variety) म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे.
दिल्ली येथील ‘प्रोटेक्शन ऑफ प्लॅण्ट व्हरायटी अँड फार्मर्स राईट ॲथॉरिटी’ (PPV & FRA) या संस्थेकडून हे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले असून, या जातीच्या प्रसाराचे सर्व हक्क आता शेतकरी भारत जाधव यांना मिळाले आहेत.
या यशात नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचा ( घतघ) मोठा वाटा आहे. दोन वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांना जाधव यांच्या बागेतील या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण वाणांबद्दल माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील उद्यानविद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर आणि पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर, ‘शेतकरी विकसित पीक जाती संरक्षण कायद्या’अंतर्गत नोंदणीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला.
यासाठी लागणारी तांत्रिक माहिती, प्रयोगशाळेतील नमुन्यांचे पृथक्करण आणि नाशिक येथील फळ व अन्नपदार्थ तपासणी करणाऱ्या ‘अश्वमेघ इंजिनीअर्स व कन्सल्टट’ यांच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेला अहवाल, या सर्व बाबींची पूर्तत करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आज या प्रक्रियेला यश आले असून, ‘जुन्नर गोल्ड’ला अधिकृत मोहोर लागली आहे. या यशाबद्दल कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी भरत जाधव यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन
प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी भरत जाधव यांनी गेल्या 22 वर्षांपासून आपल्या दोन हेक्टर जिरायत जमिनीत आंबालागवड केली आहे. त्यांच्याकडे हापूस, केशर, राजापुरी, बदामी, लंगडा अशा विविध वाणांची 400 हून अधिक झाडे आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण आंबा उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जात असल्याने फळांचा स्वाद उत्कृष्ट आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि सीताफळ, डाळिंब यांसारखी पिके घेत जाधव यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर चालवलाच, पण कृषी क्षेत्रात एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे.
‘जुन्नर गोल्ड’ या वाणाची खास वैशिष्ट्ये
वजन : एका फळाचे सरासरी वजन 900 ते 970 ग््रॉमपर्यंत भरते.
स्वाद : हापूस, केशर आणि राजापुरी या तिन्ही जातींची संमिश्र चव.
आकार : राजापुरी
आंब्यासारखा भव्य आकार.
रंग : आकर्षक केसरी रंग.