

रावणगाव: हिंगणीबेर्डी (ता. दौंड) येथे बिबट्याला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. शुक्रवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.
दौंड तालुक्याचा पूर्व भागात प्रथमच बिबट्या जेरबंद होण्याची घटना घडली. हिंगणीबेर्डी गावातील कामठे, गोधडे वस्ती येथे हनुमंत गोधडे यांच्या वस्तीलगत बिबट्या सापडला. या बिबट्याचे पाच ते सहा वर्ष वय असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्याच्या पूर्व भागात मागील काही दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला आहे.
रावणगावला बिबट्याने अडीच तास ठिय्या मांडला होता. स्वामी चिंचोली, खडकी येथे खुलेआम दर्शन तर मळद, बोरीबेल, आलेगाव परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ले करत जनावरे ठार मारल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हिंगणीबेर्डी परिसरात मागील आठ दिवसापासून वन विभागाने पिंजरा लावला होता. यामध्ये बिबट्या अडकला.
दौंड तालुक्यात बिबट्याच्या वावराने व वाढत्या हल्ल्याने आमदार राहुल कुल यांनी वन विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक उपवनसंरक्षक (पुणे) महादेव मोहिते यांनी मागील आठवडाभरापूर्वी तालुक्याला यासाठी पिंजरे उपलब्ध करून दिले होते. तालुक्यात जवळपास १४ पिंजरे लावण्यात आले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले
हिंगणीबेर्डीत बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाला प्रवीण ढवळे, शंकर जाधव, विनोद भोसले, विशाल कामठे, अमोल कामठे, समीर गोधडे या ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्य मार्गदर्शनाखाली वनपाल मनीषा उघडे, वनरक्षक शुभांगी मुंढे, गोकुळ गवळी, वन कर्मचारी शरद शितोळे, बाळु अडसूळ यांनी यासाठी रात्रंदिवस काम करत सहकार्य केले.