

खडकवासला: बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे सिंहगडसह पानशेत भागातील नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. सिंहगड परिसरात दहाहून अधिक बिबटे तसेच मादी व बछडे असल्याने स्थानिक शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.
सिंहगड पायथ्याच्या गोऱ्हे खुर्द, घेरा सिंहगड, थोपटेवाडी, मालखेड, खाटपेवाडी, खरमरी आदी ठिकाणी बिबट्यांनी कुत्री, वासरे, गायी अशा जनावरांचा फडशा पाडला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सिंहगड भागातील नागरीवस्त्या, कंपन्या, फार्महाऊस आदी ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते धनराज जोरी व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत जोरी यांनी सिंहगड वन विभागाला निवेदन दिले आहे. यावेळी स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
मालखेडमधील वेंकी कंपनी, तसेच जवळली उसाच्या शेतात बिबट्याची एक मादी व एक बछडा अधूनमधून येत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पानशेत वन विभागाचे वन रक्षक राजेंद्र निंबोरे हे वेल्हे येथून रांजणे पाबे घाटरस्त्याने खानापूरमध्ये येत परवा सोमवारी (दि.1) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मणेरवाडीतील तिरंगा हॉटेलजवळ एक बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला.
सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले, सिंहगडच्या जंगलात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा अधिवास आहे. घनदाट जंगल आणि जंगलात मिळणारी वन्यप्राण्यांची शिकार अशा पोषक वातावरणामुळे बिबट्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. नागरी वस्त्यांमध्ये बिबट्या येऊ नये, तसेच मनुष्यहानी होऊ नये, यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती केली जात आहे.
सिंहगड पानशेतच्या जंगलात धष्टपुष्ट व आकाराने मोठे असलेले बिबटे आहेत. त्यामुळे बिबटे लहान जनावरांसह म्हैस, गायी, चितळ, सांबर अशा मोठ्या जनावरांची शिकारही करत आहेत. पानशेतच्या माजी सरपंच आशा पासलकर म्हणाल्या, या भागात स्थानिक रहिवाशांपेक्षा पर्यटकांची वर्दळ अधिक आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. तसेच, गावोगाव सुरू असलेल्या कीर्तन सोहळ्याला रात्रीच्या वेळी जाण्याचे धोक्याचे झाले आहे.