

पुणे: शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि अपघातांचा केंद्रबिंदू ठरलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने आता कडक पवित्रा घेतला आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या भूसंपादनासाठी सक्तीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू केली जाणार आहे. येत्या 25 मेपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काम वेगाने करण्यात येणार आहे, अशी माहिती भूसंपादन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.
शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून, भूसंपादनासाठी शासन आणि महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू असून, पहिला टप्पा पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. कात्रज-कोंढवा मार्गावर सध्या ताशी सुमारे 15 हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ असते. त्यात अवजड वाहनांचे प्रमाण मोठे आहे.
या पार्श्वभूमीवर 84 मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 मीटर रुंदीचा रस्ता जून 2026 पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण 3.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 109 मिळकतींमधील सुमारे 41 हजार 941 चौरस मीटर भूसंपादन करणे आवश्यक आहे. यापैकी आतापर्यंत केवळ 28 जागा मालकांनी सामोपचाराने आपल्या जमिनी महापालिकेच्या ताब्यात दिल्या आहेत. मात्र, उर्वरित 81 मिळकतदारांनी अद्याप ताबा दिलेला नाही. या मिळकतदारांना प्रशासनाने दोन दिवसांची शेवटची संधी दिली असून, त्यानंतर थेट जागेचा पंचनामा करून सक्तीने ताबा घेतला जाणार आहे.
84 ऐवजी 50 मीटरवर भर
मुळात हा रस्ता 84 मीटर प्रस्तावित होता, त्यासाठी 164 मिळकतींचे 87,369 स्क्वेअर मीटर भूसंपादन करावे लागणार होते. त्यापैकी 45,427 स्क्वेअर मीटर जागा आधीच ताब्यात आली आहे. मात्र, तातडीची गरज ओळखून प्रशासनाने सध्या 50 मीटर रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. यासाठी उर्वरित 41,941 स्क्वेअर मीटर जागा येत्या 15 दिवसांत ताब्यात घेतली जाणार आहे.
दुप्पट मोबदला मिळणार
शहरी भूसंपादन कायद्यानुसार, ज्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत, त्यांना बाजारभावाच्या दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने कात्रज, कोंढवा आणि कोंढवा औद्योगिक असे तीन स्वतंत्र भाग पाडून दर निश्चित केले आहेत.
...असे असतील भूसंपादनाचे दर (प्रति चौ.मी.)
कात्रज परिसर : 25,667 रुपये (निश्चित दर) कायद्यानुसार याच्या दुप्पट रक्कम मिळणार.
कोंढवा भाग : 24,657 रुपये (निश्चित दर).
कोंढवा औद्योगिक भाग : 19,698 रुपये (निश्चित दर).
अपघातांची मालिका थांबणार?
अरुंद रस्ता आणि प्रचंड जड वाहतुकीमुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी रस्ता रुंदीकरणाची मागणी लावून धरली होती. आता प्रशासनाने सक्तीच्या भूसंपादनाचा मार्ग अवलंबल्याने पुणेकरांना या वाहतूक कोंडीतून आणि मृत्यूच्या छायेतून लवकरच सुटका मिळण्याची चिन्हे आहेत.
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. 109 मिळकतींचे भूसंपादन करणे बाकी आहे. यातील 28 जणांनी जागा ताब्यात देण्याची तयारी दर्शवली आहे. उर्वरित 81 मिळकतदारांशी बोलणी सुरू आहे. यातील काहींनी जागा ताब्यात देण्याची तयारी दर्शवली आहे. जे जागा ताब्यात देणार नाही, अशांच्या जमिनी शहरी भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने ताब्यात घेतल्या जाणार आहे. ही प्रक्रिया 25 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
निखिल मोरे, उपायुक्त, भूसंपादन विभाग, महापालिका