

खेड: खेड तालुक्यातील आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 19 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर रविवारी (दि. 21) सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या जागांवर कोण विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकाचौकांत आणि गल्लीबोळांत पुन्हा एकदा निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.
मतमोजणी राजगुरुनगर नगरपरिषदेची तालुका क्रीडासंकुलात, चाकणची मीरा मंगल कार्यालयात तर आळंदीची नगरपरिषद कार्यालयात होणार आहे. एकाच वेळी सर्व प्रभागांतील मतमोजणी सुरू होईल. प्रभागनिहाय प्रथम नगराध्यक्षपदाची मतमोजणी आणि नंतर अ, ब, क क्रमाने नगरसेवकांच्या जागांची मतमोजणी होईल. तासाभरात संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. स्ट्राँग रूममध्ये 19 दिवस कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सीलबंद ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या होत्या. रविवारी उमेदवार, निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडले जाणार आहेत. केंद्राभोवती 100 मीटर परिसरात नाकाबंदी राहील. केंद्रात पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि मोबाईल फोनवर बंदी आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार प्रतिनिधी आणि पत्रकारांच्या बैठकीत स्पष्ट केले की, आचारसंहिता कायम असून, विजयी उमेदवारांना मिरवणुका काढता येणार नाहीत. खेड तालुक्यातील या निवडणुका विशेषतः नगराध्यक्षपदासाठी चुरशीच्या ठरल्या. सत्ताधारी महायुतीतील तीन पक्षांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले, तर महाविकास आघाडीत एकजूट दिसली नाही. उद्याच्या मतमोजणीनंतर तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल.
राजगुरुनगर नगरपरिषद
10 प्रभागांतील 21 जागांपैकी 3 जागा बिनविरोध.
उर्वरित 18 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात.
34 मतदान केंद्रांवर एकूण 25,801 मतदारांपैकी 17,769 मतदान (68.87% मतदान).
नगराध्यक्षपद (सर्वसाधारण) साठी 4 पक्षीय आणि 1 अपक्ष असे 5 उमेदवार.
चाकण नगरपरिषद
12 प्रभागांतील 25 जागांपैकी 3 बिनविरोध.
उर्वरित 22 जागांसाठी 71 उमेदवार.
36 मतदान केंद्रांवर 33,125 मतदारांपैकी 24,605 मतदान (74.28% मतदान).
नगराध्यक्षपद (ओबीसी महिला राखीव)साठी 4 महिला उमेदवार.
आळंदी नगरपरिषद
10 प्रभागांतील 21 जागांपैकी 1 बिनविरोध.
उर्वरित 20 जागांसाठी 62 उमेदवार.
30 मतदान केंद्रांवर 25,331 मतदारांपैकी 19,165 मतदान (75.66% मतदान).
नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार.