

इंदापूर: इंदापूर नगरपरिषदेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीचा दिवस रविवार, दि. 21 काही तासांवर येऊन ठेपला आहे. निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने दोन्हीही बाजूंनी आम्हीच जिंकणार, गुलाल आमचाच, असा दावा चर्चेतून केला जात आहे. निकालाची आतुरता आता शिगेला पोहचली असून, विजयाची आशा लागल्याने विजयी मिरवणूक जल्लोषात काढण्यासाठी कार्यकर्त्यांकडून गुलाल, ढोल-ताशे, वाजंत्री यांना सुपारी देण्यात आली आहे. अनेकांनी पेढे, मिठाईच्या ऑर्डर दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध राष्ट्रवादी (श. प.) गटाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे माजी आमदार यशवंत माने, प्रवीण माने यांच्यासह दोन्ही शिवसेना, रासप, मनसे यांची कृष्णा-भीमा विकास आघाडीकडून कडवे आव्हान उभे करण्यात आले. ’राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध इतर सर्व पक्ष’ असाच सामना इंदापुरात रंगला. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून भरत शहाविरुद्ध त्याच पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नगराध्यक्षपदावरून एल्गार पुकारत जुन्या-नव्या विरोधकांसह सवंगड्यांना एकत्रित करीत नगराध्यक्षपदाला उभे राहत निवडणुकीत रंगत आणली.
प्रचाराच्या तोफा शहरातील चौकाचौकांमध्ये धडाडल्या. एकमेकांविरोधात टिकाटिप्पणी अगदी वैयक्तिकरीत्या टोकाची झाली. मंगळवारी 2 डिसेंबर रोजी मतदान सुरू असतानाच बातमी धडाडली ती मतमोजणी उद्या बुधवारी 3 डिसेंबरला न होता ती 21 डिसेंबरला होणार आणि तेव्हापासून सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे.
दोन्हीही बाजूंनी नगराध्यक्षापदासह वीसही नगरसेवकपदे आम्हीच जिंकणार, आमचाच गुलाल पडणार, आम्हीच विजयी होणार, अशा पद्धतीचे दावे होऊ लागले. अनेकांनी आमचीच बाजू विजयी होणार, असे म्हणत विरोधकांबरोबर पैजा लावल्या.
यामध्ये पैशाची, जेवणाची, बाहेरगावी सफरीला घेऊन जाण्याची, देवदेवतांच्या दर्शनाची, यासह कपड्यांचा पूर्ण पोशाख अशा अनेक लहान-मोठ्या पैजा शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व नेतेमंडळींनी लावल्या आहेत.