

जयवंत गिरमकर
देऊळगाव राजे: शासनाकडून गरजू रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीच्या योजना आज खासगी रुग्णालयांसाठी उत्पन्नाचे साधन ठरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आजारपणामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मदतीच्या नावाखाली वेठीस धरण्याचा प्रकार अनेक रुग्णालयांमध्ये सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे.
शासकीय योजनेअंतर्गत उपचार घ्यायचे असल्यास रुग्णांच्या नातेवाइकांना विविध कागदपत्रे जमा करण्यासाठी अक्षरशः दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सर्व कागदपत्रे सादर करूनही पुढे ’पेशंट जास्त आहेत’, ’एक ते दोन महिने वाट पाहावी लागेल’ असे सांगितले जाते. मात्र, याच वेळी अर्धी रक्कम भरल्यास तत्काळ ऑपरेशन किंवा उपचार करण्याची तयारी रुग्णालयांकडून दर्शविली जात असल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.
शासकीय योजनेचा खरा लाभ गरजू व गरीब रुग्णांपर्यंत यामुळे पोहचत नसून, आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना नाइलाजाने कर्ज काढून किंवा हातउसनवारी करून उपचारांसाठी पैसे भरावे लागत आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांच्या गंभीर स्थितीचा फायदा घेत दबाव टाकण्याचे प्रकारही घडत असल्याचे समोर येत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे शासनाच्या आरोग्य योजनांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी तसेच रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळतील, याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.