Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचे २,२९१ रुग्ण; महापालिका प्रशासन अलर्ट

डासोत्पत्ती रोखण्यासाठी चार विभागांना समन्वयाने काम करण्याचे आयुक्तांचे आदेश; ६.३० लाखांचा दंड वसूल
Dengue
DenguePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती दिली आहे. आत्तापर्यंत शहरात डेंग्यूचे २ हजार २९१ रुग्ण आढळले असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभागासह बांधकाम, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाला समन्वयाने काम करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी (दि. २४) दिले आहेत. दरम्यान, रुग्णालयांमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

Dengue
Someshwar Sugar Factory: 'सोमेश्वर'च्या सभासद शेतकरी आणि कामगारांची दिवाळी गोड; ऊस उत्पादकांना ६०.११ कोटींचे वितरण

आयुक्त राम यांनी शनिवारी बाणेर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ. नायडू संसर्गजन्य आजार रुग्णालयाला भेट देऊन उपचारव्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. बांधकामांच्या ठिकाणी साचणारे पाणी, कचरा डेपो, अतिक्रमणांच्या जागा, घरांतील कुंड्या आणि पाण्याच्या साठ्यांमुळे एडिस डासांची उत्पत्ती होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

Dengue
Parth Pawar notice: मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी खा. पार्थ पवार यांना नोटीस

त्यामुळे संबंधित विभागांनी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला दिल्या. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये शहरात डेंग्यूचे ४ हजार ९०८, तर २०२५ मध्ये २ हजार ३९१ रुग्ण नोंदविण्यात आले. यंदा आत्तापर्यंत २ हजार २९१ रुग्ण आढळले आहेत. वातावरणातील बदल, वाढती बांधकामे आणि पाणी साठवून ठेवण्याच्या सवयींमुळे डासोत्पत्तीचा धोका वाढत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Dengue
Khed accident news: आठ महाविद्यालयीन युवतींना मोटार व दुचाकीने उडवले; कुरकुंडी फाटा येथील अपघात

डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या पथकांनी १४ लाख घरांना भेटी देऊन २८ लाख ३१ हजार ३८६ पाण्याच्या साठ्यांची तपासणी केली. त्यामध्ये १३ हजार घरांतील १८ हजार ८८५ कंटेनरमध्ये एडिस डासांच्या अळ्या आढळल्या. याप्रकरणी २ हजार ६६४ मिळकतींना नोटिसा बजावून ६ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, डेंग्यू निदानासाठी महापालिकेच्या दवाखान्यांत मोफत रॅपिड डायग्नोस्टिक किट उपलब्ध आहेत. नायडू, कोटणीस आणि कमला नेहरू रुग्णालयांत मोफत पुष्टीकरण चाचण्यांची सुविधा आहे. हॉटस्पॉट भागांत औषध फवारणी, अळीनाशकांचा वापर आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

Dengue
Khed illegal mining case: अवैध गौणखनिज उत्खननाच्या कारवाईत महसूल पथकाचा रस्ता अडवला; खेडमध्ये गुन्हा दाखल

महापालिका रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या उपचारासाठी पुरेशा खाटा आणि औषधसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून न जाता डेंग्यूची लक्षणे आढळल्यास जवळच्या रुग्णालयात त्वरित उपचार घ्यावेत. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह बांधकाम, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागांनी समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

नवल किशोर राम, आयुक्त महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news