खराडी चौकातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचा अंतिम आराखडा तयार

खराडी चौकातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचा अंतिम आराखडा तयार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नगर रस्त्यावर खराडी बायपास चौकात महापालिकेकडून उभारण्यात येणार्‍या उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचा (ग्रेड सेपरेटर) आराखडा अंतिम झाला आहे. मात्र, या मार्गावरून वाघोलीपर्यंत मेट्रो प्रस्तावित असल्याने त्यास अडथळा येणार नाही यासाठी महामेट्रोकडून या आराखड्याची चाचपणी केली जाणार आहे. खराडी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने या ठिकाणी उड्डाणपुलासह भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे.

या पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी 'मे. क्रिएशन इंजिनिअर्स. प्रा. लि.' या कंपनीची पालिकेने सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. या सल्लागाराने या चौकात प्रतितासाला जाणार्‍या वाहनांचा अभ्यास करून उड्डाणपुलाचा आराखडा तयार केला आहे. या चौकातील वाहनांची क्षमता 10 हजार 357 इतकी आहे, प्रत्यक्षात मात्र सध्या प्रतितास 13 हजार 153 वाहने धावत आहेत.

अशी असेल उड्डाणपुलाची रचना

महापालिकेने केलेल्या आराखड्यानुसार मुंढव्याकडून वाघोलीकडे जाण्यासाठी 580 मीटर लांबीचा भुयारी मार्ग तर येरवड्याकडून मुंढव्याच्या दिशेने जाण्यासाठी 850 मीटर लांबीचा उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. त्यानुसार थेट नगरकडून पुण्याच्या दिशेने येण्यासाठी अथवा जाण्यासाठी थेट उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग नसणार आहे. तर जो उड्डाणपूल होणार आहे, तो येरवड्याकडून उजवीकडे वळून मुंढव्याकडे जाणार्‍या वाहनांसाठी असणार आहे. तर मुंढव्याकडून वाघोलीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग असणार आहे.

आता प्रतीक्षा महामेट्रोच्या ग्रीन सिग्नलची

सध्या नगर रस्त्यावर खराडीपर्यंत मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे, तर वाघोलीपर्यंत ही मेट्रो प्रस्तावित आहे. त्यामुळे खराडी चौकातील उड्डाणपूल व भुयारी मार्गाचा मेट्रोच्या खांबास अडथळा येऊ नये यासाठी आता महामेट्रोकडून पालिकेने केलेल्या आराखड्याची तपासणी केली जाईल. त्यानुसार पालिकेने मेट्रोला हा आराखडा पाठविला आहे. मेट्रोचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही होईल.

खराडी आणि विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलांचा आराखडा तयार झाला आहे. आता या दोन्ही पुलांच्या कामांच्या निविदा लावण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्या पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच निविदा लागून महापालिका निवडणूकीपूर्वीच या दोन्ही पुलांच्या भूमिपूजनाचा नारळ फुटेल.

                                                            – सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news