

पुणे: व्यावसायिक केतन अगरवाल यांच्या खुनाच्या तपासात आता बीड कनेक्शन समोर आले आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी रचलेला खुनाचा कट त्यांच्या बीडमधील वर्गमित्रालाही आधीपासून माहीत असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी बालेवाडी परिसरात राहणाऱ्या या तरुणाची कसून चौकशी केली असून, सध्या त्याला ताब्यात घेण्यात आलेले नसले, तरी त्याच्याकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी सुरू आहे.
पोलिस तपासानुसार, मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून चेतन चौधरी आणि संबंधित तरुण यांच्यात सातत्याने संपर्क होता. याच काळात केतनला संपवण्याचा कट रचला जात होता. आरोपी सिया गोयल आणि चेतन यांनी मिळून तयार केलेला संपूर्ण आराखडा त्यांनी या वर्गमित्रासोबत आधीच शेअर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. १८ जून रोजी लोहगडावर येण्यासाठी आरोपींनी संबंधित तरुणाकडे वारंवार आग्रह धरला होता.
मात्र, काही कारणांमुळे तो गडावर गेला नाही. त्याच दिवशी केतनला दरीत ढकलून ठार मारल्यानंतर चेतन चौधरी थेट या वर्गमित्राला भेटल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. केतनचा खून झाल्याची माहिती सर्वप्रथम त्यालाच देण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. सियानेही या तरुणाशी संपर्क साधून संवाद साधल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान संबंधित तरुणाने सिया आणि चेतन यांना केतनचा खून करू नका, असे पाऊल उचलणे महागात पडेल, असा सल्ला दिल्याचा दावा केला आहे.
मात्र, खुनाचा कट रचला जात असल्याची माहिती असूनही त्याने पोलिसांना याची कल्पना का दिली नाही, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे त्याची भूमिका नेमकी काय होती, याचा सखोल तपास सुरू आहे. यापूर्वीच्या तपासात सियाने १८ जूनची तारीख मुद्दाम निवडल्याचे समोर आले होते. दुसऱ्याच दिवशी महाबळेश्वर येथे स्वतःच्या वाढदिवसाची पार्टी असल्याने संशय येणार नाही, असा आरोपींचा अंदाज होता. केतनला लोहगडावर बोलावून दरीत ढकलण्यात आले आणि त्यानंतर अपघाताचा बनाव रचण्याचाही प्रयत्न झाल्याचा संशय तपासातून व्यक्त करण्यात आला आहे.
आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
या खून प्रकरणातील प्रत्येक डिजिटल पुरावा, कॉल रेकॉर्ड आणि आरोपींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासून पोलिस कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.