Pune Rain Update: पुण्यात ४८ तासांपासून संततधार; भुशी धरण ओव्हरफ्लो, घाटमाथ्यावर ६ जुलैपर्यंत रेड अलर्ट

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली; कात्रज व वरंधा घाटात दरडी कोसळल्या, शहरात आणखी तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
Pune Rain Update
Pune Rain UpdatePudhari
Published on
Updated on

पुणे: यंदाच्या हंगामात शहरावर पावसाची जलधार सुरू असून, गत ४८ तासांपासून ती सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून, चिखल साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. टेकड्यांवर प्रथमच हिरवी चादर पसरताना दिसू लागली असून, शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी भाविकांनी संततधार पावसातही लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले. दोन दिवसांत शहरात ३७ मि.मी., तर यंदाच्या हंगामात एकूण ९० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्याला ६ जुलै पर्यंत रेड अलर्ट दिल्याने शहरात अजून तीन दिवस असाच संततधार पाऊस राहणार आहे.

Pune Rain Update
India Post Parcel Pickup Service: पुणेकरांसाठी खुशखबर! आता घरबसल्या इंडिया पोस्टकडून पार्सल पिक-अपची सुविधा

शहरात संपूर्ण जून महिनाभर पाऊस नव्हता. मात्र, अखेरच्या चार दिवसांत ३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर जुलैची सुरुवात चांगली झाली. सतत दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात संततधार सुरू आहे. गुरुवारी शहरात दिवसभर अत्यंत धिम्या गतीने जलधार सुरू होती. शुक्रवारचा दिवस उगवला तो संततधार पावसाने. संपूर्ण दिवस शहरातील सर्वंच भागात एकाच वेगाने भिजपाऊस पडत होता. गत २४ तासांत शहरात ३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्री ८ पर्यंत शहरात सरासरी ११ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

गरम चहा, भजी आणि वडापाववर ताव

गत ४८ तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे गरम चहा, भजी आणि वडापावच्या गाड्यांवर गर्दी झालेली दिसत होती. पावसात भिजलेले नागरिक गरम पदार्थ खाताना दिसत होते. नाट्यगृह, सिनेमागृहात प्रामुख्याने हे चित्र जास्त प्रमाणात दिसत होते.

Pune Rain Update
Maharashtra Teachers Protest: ७ व ८ जुलैला राज्यभर शाळाबंद! शिक्षकांच्या आंदोलनाचा सरकारला इशारा

भाविकांची छत्र्या, रेनकोट घेत दर्शनासाठी धावपळ

शुक्रवारी चतुर्थी असल्याने शहरातील गणपती मंदिरात भाविकांनी छत्री, रेनकोट घेत जलमय झालेले रस्ते अन् चिखलातून वाट काढत गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. दगडूशेठ, सारसबाग, त्रिशुंड्या गणपती, कसबा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. बहुतांश मंदिरात सहस्त्रावर्तनाचे पाठ सुरू होते. त्यासाठीही मोठी गर्दी होती. सायंकाळी शहरातील गल्ली बोळातील मंदिरात नागरिकांनी पावसात आरती केली.

शहरात शुक्रवारी झालेला पाऊस

आंबेगाव- कात्रज, शिवाजीनगर १६.२, पाषाण १३.२, एनडीए १३, चिंचवड ८, खडकवासला : २३.६ मि.मी., वारजे : २३.८, गरवारे, डेक्कन : २१.२, बालेवाडी ७.५, लवळे ५.५ मिमी.

घाटमाथा पाऊस ( मि.मी.)

लोणावळा :१४०, शिरगाव :१३०, शिरोटा :५८, ठाकूरवाडी : ४७, वाळवण : ९६, आंबोणे : १०८, भिवपुरी : ७९, दावडी :१३५, डुंगरवाडी : १४, कोयना : ८४, खोपोली : १००, खंड : ७१, ताम्हिणी : १७०, भिरा : २१०, धारावी : १२२.

जिल्ह्यात २४ तासांत पाऊस (मि.मी.)

भोर : ७४, चिंचवड : ३६.५, माळीण : ३३, निमगिरी : २६, दापोडी : २५, शिवाजीनगर : २५.३, डुडूळगाव : १४, राजगुरुनगर : १४.

Pune Rain Update
Khed Ganja Seizure: खेड पोलिसांची धडक कारवाई! शिरोलीत ₹3.25 लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक

भुशी धरण ओव्हरफ्लो!

लोणावळा शहरामधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य केंद्र आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेले भुशी धरण शुक्रवारी (दि. ३) अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी धरण पूर्ण भरून वाहू लागल्याची बातमी समजताच, पर्यटकांनी धरण परिसराकडे धाव घेत मोठी गर्दी केली होती. लोणावळा शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. २ जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत शहरात तब्बल ११६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने नंतर विश्रांती घेतली होती. त्यानंतर ३० जूनपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. सलग चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि शुक्रवारी धरण ओव्हरफ्लो झाले. भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी भुशी धरणावर येत असतात. आज सकाळपासूनच पर्यटकांचा ओघ सुरू झाला असून, शनिवार व रविवारी वीकेंडला येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाहतूककोंडीवरून विशेष बैठक

शनिवार आणि रविवार मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूककोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी लोणावळा नगर परिषद कार्यालयात शहर पोलिस, नगर परिषद प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करून वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सूचना

भुशी धरण भरल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा शहर पोलिस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. पर्यटन स्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहर पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Pune Rain Update
Wagholi Water Supply Project: वाघोली पाणी योजनेचा धक्कादायक खुलासा! ३० महिने काम सुरू, पण पाण्याचा कोटाच नाही

खळाळले धबधबे!

तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लोणावळा धरणासमोरील डोंगरामधून वाहणारे धबधबे खळखळून वाहू लागले आहेत. या ठिकाणी वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची आज गर्दी झाली होती. भुशी धरणावरही पर्यटक मोठ्या संख्येने जात होते. मात्र, भुशी धरण निम्मे भरले असून, पूर्ण भरल्यानंतर धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहू लागेल. तूर्तास तरी पर्यटक धरणाच्या कोरड्या पायऱ्यांवर उभे राहून पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. अनेकांनी धरणावर जाऊन पुन्हा माघारी येत लोणावळा धरणासमोरील धबधबा व लायन्स पॉईंटकडे जाण्याला पसंती दिली.

लोणावळा शहरामध्ये दरवर्षी वर्षाविहारासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. यंदा जून महिन्यात लोणावळा शहरात जेमतेम पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्याची सुरुवात ही संततधार पावसाने झाली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे खळखळून वाहू लागले आहेत. हा निसर्गरम्य नजारा पाहण्यासाठी पर्यटक सहारा पुलाजवळ वाहने थांबवत गर्दी करत होते. अनेकांनी या धबधब्यांमध्ये जाऊन मनमुराद भिजण्याचा आनंद घेतला. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरही अनेक पर्यटक जात होते. धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहण्यास अजून काही अवधी शिल्लक आहे.

कात्रजमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळली

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कात्रज परिसरातील अंजनीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. गंधर्व लॉन्स शेजारून जाणाऱ्या या रस्त्याच्या उजव्या बाजूला वन विभागाच्या हद्दीतील डोंगर आहे. पावसामुळे या डोंगरभागाची माती ठिसूळ होऊन त्याचा काही भाग थेट रस्त्यावर ढासळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या डोंगराचा रस्त्याकडील भाग घुशी आणि उंदरांनी पोखरल्यामुळे आधीच पोकळ झाला होता. त्यातच आता दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर ओलावा निर्माण झाला असून, हा भाग अधिकच कमकुवत होऊन सातत्याने खाली पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

वरंध घाटात दरड कोसळली

भोर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात शिरगाव, वारवंड हद्दीत दरड कोसळली. यामुळे दोन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने तत्परतेने काही तासात वाहतूक सुरळीत केली. भोर तालुक्यात मागील दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी (दि. २) रात्रीपासून जोरदार पावसाचा जोर असल्याने वरंधा घाटात वारवंड तसेच शिरगाव (ता. भोर) हद्दीत शुक्रवार सकाळी आठच्या दरम्यान दरड कोसळली. यामुळे दोन्ही बाजूंनी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. यंदा पावसाने जून महिन्यात ओढ दिली होती. मात्र, जुलै उजाडताच पाऊस तालुक्यात सर्वदूर जोरदार बरसत आहे. बहुतांशी भागातील ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे भोर तालुक्यातील तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. वरंध घाट परिसरात शुक्रवारी (दि. ३) मुसळधार पावासामुळे दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. रस्त्यावर राडारोडा आल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. या घटनेची माहिती स्थानिकांनी संबंधित विभागाला दिली. महामार्ग प्रशासनाने रस्त्यावरील राडारोडा बाजूला केला. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news