

पुणे: सिंहगड एज्युकेशन सोसायटीतील २७ शिक्षकांच्या वेतनाचा अपहार केल्याप्रकरणी संस्थापक मारुती नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका शिक्षिकेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अपहार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड एज्युकेशन संस्थेचे मारुती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले-अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले, लेखा विभागाचे संजय मोरे, शरद जराड यांच्यासह सात जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिक्षिका या सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. एप्रिल २०२० पासून सिंहगड संस्थेने त्यांचे वेतन अदा केले नव्हते. गेल्या साडेपाच वर्षांत तक्रारदार शिक्षिकेचे १९ लाख ३६ हजार रुपयांचे वेतन थकीत होते.
तक्रारदार शिक्षिकेसह २७ जणांचे वेतन थकीत होते. वेतन मिळवण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यांना वेतन दिले नाही. त्यामुळे फसवणूक तसेच अपहार केल्याप्रकरणी शिक्षकांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात मारुती नवलेंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करत आहेत.