

रामदास डोंबे
खोर: केडगाव (ता. दौंड) गावाचा मुख्य आर्थिक आधार असलेली केडगावची बाजारपेठ सध्या अतिक्रमण, कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अक्षरशः त्रस्त झाली आहे. बाजारपेठेतील रस्ते अरुंद झाले असून, पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे केवळ व्यापारीच नव्हे, तर खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे.
मंगळवारी साप्ताहिक बाजार भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कचरा उचलला जात नाही. परिणामी बाजार मैदानात कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे संपूर्ण परिसर अस्वच्छतेच्या संकटात सापडला आहे. त्यातच बाजार मैदानातच कचरा टाकण्याची सवय वाढत चालल्याने सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
ग््राामपंचायत हद्दीतील बाजारासमोरील जागेत काही वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय या परिसरात असावी अशीच अपेक्षा होती. मात्र, अनधिकृत अतिक्रमण वाढल्याने आज त्या जागेचा नागरिकांना कोणताच फायदा होत नाही. अतिक्रमण हटविले गेले, तर बाजारपेठेत प्रशस्त जागा उपलब्ध होऊ शकते, असा ठाम सूर नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
यातील आणखी एक गंभीर प्रश्न म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृहाचा आहे. ग््राामपंचायतीने उभारलेले स्वच्छतागृह गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छतेच्या कारणावरून बंदच आहे. त्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाजारपेठेत येणारे ग््राामस्थ यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छता मोहिमांचे गाजावाजा होत असताना गावातील मध्यवर्ती स्वच्छतागृह अक्षरशः कुलूप बंद अपयश सांगणारी बाब मानली जात आहे.
केडगाव मुख्य बाजारपेठेत वाढलेले अतिक्रमण, कचरा व्यवस्थापनातील दिरंगाई आणि सार्वजनिक सुविधांचा अभाव हा गंभीर विषय आहे. अतिक्रमण तातडीने हटवून स्वच्छता व्यवस्था सुधारावी, बाजार मैदानातील कचरा त्वरित उचलण्याची जबाबदारी ग््राामपंचायतीने सक्षमपणे पार पाडावी आणि बंद स्वच्छतागृह नागरिकांसाठी पुन्हा सुरू करावे. नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असताना ग््राामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते, स्वच्छता, पार्किंग आणि स्वच्छतागृहाच्या सुविधा कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण केडगावचे लक्ष लागले आहे.
कानिफनाथ विधाते, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, केडगाव