

भिगवण: सरकारी योजनेतून दीड हजार रुपये महिना मिळवून देण्याचे आमिष दाखवून 80 वर्षीय वृद्धेची फसवणूक करून जमीन लिहून घेतली. त्यानंतर या जमिनीची विक्री करीत ते पैसे देखील काढून घेतल्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे घडला. महत्त्वाचे म्हणजे या फसवणुकीत वृद्धेचा नातू देखील सहभागी होता हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून याबाबत भिगवण पोलिसांनी नातवासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये रमेश बबन चांदगुडे या म्हसोबाचीवाडीतील प्रमुख व्यक्तीसह इंदापूर तालुक्यातील तावशी येथील वृद्धेचा नातू प्रीतम पांडुरंग मंडलिक, इंदापूर तालुक्यातील कळस येथील कुलदीप पोपट रकटे, बारामतीतील ओम नागेश लोंढे, मळद येथील मयूर बापू रसाळ व काटेवाडी येथील सागर दादा भिसे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रीतम मंडलिक हा आजीचा नातू आहे. म्हसोबाची वाडी येथील वृद्ध महिला गोदाबाई नानासाहेब चांदगुडे असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. भिगवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 318(4), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदाबाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी म्हसोबाचीवाडी येथे त्या असताना नातू प्रीतम आणि त्याचे दोन मित्र म्हसोबाचीवाडी येथे आले व त्यांनी बारामतीतील शासकीय योजनेचे पैसे मिळणार असल्याचे गोदाबाईंना खोटे सांगून बारामतीतील दुय्यम निबंध कार्यालयात घेऊन गेले. त्या ठिकाणी रमेश बबन चांदगुडे व त्याचे दोन ते तीन मित्र होते. नेमके कशाचे पैसे मिळणार आहेत, अशी विचारणा केली असता नातू प्रीतम मंडलिक आणि रमेश चांदगुडे यांनी सांगितले की, जवाहर रोजगार योजनेचे पैसे मिळणार आहेत असे सांगितल्यानंतर आमच्यावर विश्वास नाही का? असा प्रश्न विचारल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण अधिकाऱ्यासमोर फोटो काढून अंगठा दिला, असे गोदाबाई यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
त्यानंतर 14 ऑक्टोबर 2025 रोजी नातू प्रीतम मंडलिक याने तुझ्या खात्यावर जवाहर योजनेचे पैसे जमा झाले आहेत, ते पैसे आपण बँकेत जाऊन घेऊ, असे गोड बोलून 13 ऑक्टोबर 2025 रोजी घोलपवाडी येथील पुणे जिल्हा बँकेत व दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी शेटफळगढे येथील पुणे जिल्हा बँकेत नेऊन आपला अंगठा घेतला व खर्चासाठी दीड हजार रुपये दिले, असे गोदाबाई यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान 16 ऑक्टोबर 2025 रोजी गोदाबाई यांचा नातवाईक भूषण चांदगुडे यांनी गोदाबाई यांना 29 गुंठे जमीन कोणाला विकली आहेस का? असे विचारले. त्यावर गोदाबाई यांनी नाही म्हणून सांगितले. परंतु प्रीतम हा आपल्याला बारामतीला घेऊन गेला होता. त्यावेळी रमेश चांदगुडे हा त्याठिकाणी हजर होता.
त्याच्यावर विश्वास ठेवून मी अधिकाऱ्यासमोर फोटो काढून अंगठा दिलेला असल्याची माहिती गोदाबाई यांनी दिली. त्यावरून भूषण याने तो दस्त काढून ही जमीन विकली असल्याची माहिती दिली आणि ही जमीन रमेश चांदगुडे यांच्या नावावर खरेदीखत करून दिली असून, साक्षीदार म्हणून कुलदीप पोपट रकटे, मयूर बापू रसाळ, ओम नागेश लोंढे व सागर दादा भिसे यांची नावे दिसून आली. त्यानंतर मात्र गोदाबाई यांच्या बँक खात्यावरील माहिती घेतली असता भूषण चांदगुडे यांनी बँकेचे स्टेटमेंट काढले. तेव्हा 6 ऑक्टोबर 2025 रोजी रमेश चांदगुडे यांनी गोदाबाई यांच्या बँक खात्यावर 2 लाख 40 हजार रुपये हस्तांतरित केलेले दिसत आहे. त्यानंतरही रक्कमा काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपल्या वयोवृद्धपणाचा व अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन नातू प्रीतम मंडलिक, खरेदीदार रमेश चांदगुडे व त्याच्या साथीदारांनी चालू बाजारभावापक्षा कमी किमतीत जमीन खरेदी करून रमेश चांदगुडे याच्या नावावर खरेदी करून घेतली आहे. त्यावरून संबंधित महिलेने संगनमताने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली. त्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला आहे.