

ग्राहकपेठेचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष, ग्राहक व सहकारी चळवळीचे प्रणेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, गेल्या काही दशकांतील पुण्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतराचे साक्षीदार, अशी सूर्यकांत पाठक यांची ओळख. पाठक यांनी स्वतः एकही निवडणूक लढविली नाही. मात्र, विविध निवडणुकांमध्ये काका वडके, अण्णा जोशी, अरविंद लेले आदी मान्यवरांच्या प्रचारात त्यांनी हिरिरीने भाग घेतला आहे. जोरदार भाषणेही ठोकली आहेत. महापालिका निवडणुकीत एका उमेदवाराविरुद्ध केलेल्या घणाघाती टीकेमुळे त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग त्यांच्या कायमचा लक्षात राहिला आहे. त्याबद्दल त्यांच्याच शब्दांत...
सूर्यकांत पाठक
मी कधीही कुठल्याही राजकीय पक्षाच्या निवडणुकीला आजपर्यंत उभा राहिलेलो नाही. त्यामुळे माझा डायरेक्ट निवडणुकीशी कधीही संबंध आलेला नाही. पण, माझ्या लक्षात राहिलेली निवडणूक, असा विषय असल्याने महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान माझ्या आयुष्यातील त्या अविस्मरणीय प्रसंगाबद्दल आवर्जून सांगावेसे वाटते. त्या वेळी मी कॉलेजमध्ये होतो. 1972-73 ला एफवाय किंवा एसवायला असेन. कसबा पेठेतील शिंपी आळीत राहत होतो. शिंपी आळी चौकात काका वडके यांचे जय महाराष्ट्र मंडळ होते. त्याचा मी कार्यकर्ता होतो. पुण्यामध्ये जनसंघाचे काम तेव्हा मधू नागपुरे करीत होते. मी पण संघाचा स्वयंसेवक होतो. कसबा पेठेतील अभिमन्यू शाखेत जात असल्याने संघाच्या बऱ्याच लोकांशी आणि नागपुरे यांच्याशीही माझा परिचय होता.
त्या वेळी महापालिकेच्या निवडणुकीला काका वडके उभे होते. त्यांचीही ती पहिलीच निवडणूक होती. त्यांच्याविरोधात जनसंघाचे मधू नागपुरे आणि एकेकाळी गाजलेले प्रसिद्ध पहिलवान गोविंद तारू उभे होते. तेव्हा प्रभागपद्धती नव्हती. प्रत्येक वॉर्डातून एकच उमेदवार निवडून दिला जात असे. बिंदुमाधव जोशी, श्रीकांत, सुधीर फडके हे काका वडके यांचे मित्र होते. बिंदुमाधव जोशी यांच्याशी माझेही जवळचे संबंध होते.
एकेदिवशी सुधीर फडके यांच्या घरी बिंदुमाधव जोशींची भेट झाली, त्या वेळी ते मला म्हणाले की, आपल्याला काका वडके यांना निवडून आणायचे आहे. त्यांना मदत करायची आहे. तू त्यांच्या प्रचाराचे काम कर. त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘अहो, हे मला कसे काय जमणार?’ त्यावर मला धीर देत ते म्हणाले, ‘अरे, घाबरू नकोस, तू कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धेतून भाग घेतोस, जोरदार भाषणे ठोकतोस तसेच तू काका वडकेंसाठी भाषण कर, बस्स.’ बिंदुमाधव जोशींच्या आग्रहाखातर मी त्याला कसाबसा तयार झालो.
निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत काका वडके यांच्या प्रचारासाठी एक दिवस कसबा पेठेत कसबा गणपतीसमोर सभेचे आयोजन केले होते. मोठी सभा झाली. या सभेला व्यासपीठावर बिंदुमाधव जोशी आणि सुधीर फडकेही नव्हते. कोणी नामवंतही व्यासपीठावर नव्हते. पण, मला त्यांनी बोलायला उभे केले. त्यांनी मुद्दे दिले. ते पाहिल्यावर मला वाटले की, आपण तर संघाचे स्वयंसेवक. मग मधू नागपुरेंविरुद्ध कसे काय बोलायचे? पण, मग मी मनोमन ठरविले की, आपण नागपुरे यांच्याविरोधात काही बोलायचे नाही. फक्त गोविंद तारूंविरुद्ध बोलायचे. गोविंद तारू यांच्याबद्दल मला काही फारसे माहीत नव्हते. फक्त एवढेच समजले होते की, ते आळंदीत राहतात. त्यामुळे भाषण करताना मी म्हणालो, ‘आळंदीच्या या रेड्याला हा कसबा गणपती उलथवून टाकेल.’
सभा संपल्यावर आमच्या संघाचे सगळे लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणू लागले, अरे, तू त्या गोविंद तारूंविरुद्ध असे कसे काय बोललास? तुला माहित आहे का, त्यांच्यावर खुनाचे किती गुन्हे दाखल आहेत? आता तुझे काही खरे नाही, असे म्हणून मला त्यांनी घाबरवले. म्हणून मी खातरजमा करण्यासाठी काका वडके यांच्याकडे गेलो. त्यांना या लोकांनी काय काय सांगितले, हे सगळे सांगून विचारले की, हे खरे आहे काय? त्यावर ते म्हणाले की, तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर. तू जाऊन त्या गोविंद तारूंनाच भेट. काकांच्या सांगण्यावरून मी त्यांना भेटायला गेलो. कसबा पेठेतील सरदार मुजुमदार बोळात ते राहत होते. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना मी सांगितले. मला काही माहीत नव्हते. पण, भाषण करताना मी असे असे बोललो आहे. त्यावर ते म्हणाले की, अरे, जाऊ दे रे. तुला कोण विचारणार नाही. काळजी करू नकोस, असे सांगत त्यांनी माझ्याशी दोस्ती करीत मला चहा पाजला आणि मला परत पाठवून दिले. लोकांनी उगीच मला तेव्हा घाबरवले होते.
नंतर त्या निवडणुकीत काका वडके निवडून आले. त्यामुळे माझी खूप कुंचबणा झाली. एकीकडे मी संघाचा स्वयंसेवक म्हणून जनसंघाची बांधिलकी, तर दुसरीकडे शिवसेनेचे काका वडके, अशी तारांबळ उडाली. त्यामुळे मी ठरवून टाकले की, राजकारण हा आपला विषय नाही, म्हणून नंतर मी कधीही निवडणुकीला उभा राहिलो नाही. मात्र, नंतरही अनेक निवडणुकांमध्ये मी कामे केली आहेत. अण्णा जोशींची निवडणूक. आणीबाणीनंतर झालेली अरविंद लेलेंची पहिली निवडणूक. त्या वेळी तर संघाचा प्रमुख म्हणून मी आणि माधव देशपांडे यांनी त्यांचे काम करून त्यांना निवडून आणले होते. त्याचे केंद्र कसबा पेठेतील देशमुख प्रकाशन हे केंद्र होते. तेथून लेलेंच्या निवडणुकीची सर्व सूत्रे आम्ही हलवत होतो. ग््रााहकपेठेचे काम करायला लागल्यावर कधीही राजकारणात पडायचे नाही, हे आमचे प्रिन्सिपल मी कसोशीने पाळले. (शब्दांकन : सुनील कडूसकर)