

कडूस : पुढारी वृत्तसेवा : कडूस गावाला वरदान ठरलेला पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या पाझर तलावाच्या सांडव्यावरून २७०० क्युसेक वेगाने कुमंडला नदी पात्रात प्रवाह सुरू झाला आहे.
पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रासह श्री कुंडेश्वर डोंगर परिसरात आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. या पावसाने ओढे, नाले खळाळून वाहू लागल्यामुळे संपूर्ण पाणी पाझर तलावाला मिळत असून तलाव १०० टक्के भरला.
या पाझर तलावाला स्वयंचलित दरवाजे नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून तलावाच्या सांडव्यावरून बुधवारी (दि. १३) सकाळी पाणी वाहू लागल्यामुळे कुमंडला नदी प्रवाहित झाली. परिणामी नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रांत सतत पावसाची दमदार बँटिंग सुरू असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचारी पाण्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
कडूस गावाला वरदान ठरलेला पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील हजारो हेक्टर शेतीला या पाण्याचा फायदा होणार असून गावचा पाणी प्रश्ननही मिटला आहे. तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य झाला आहे. तलाव परिसराला एखाद्या पर्यटन स्थळासारखे वैभव प्राप्त झाले आहे.
कडूस बसस्थानकाजवळ असणाऱ्या कुमंडला नदीवरील पुल पाण्याखाली जाऊन पुलाला असणारे संरक्षण कठडे तसेच पाईप वाहून गेले आहे. पाण्याने नदीचे पात्र सोडले असून स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले आहे.