परराज्यातील नागरिकांना आता गोव्यातील आडनावे धारण करता येणार नाहीत? | पुढारी

परराज्यातील नागरिकांना आता गोव्यातील आडनावे धारण करता येणार नाहीत?

पणजी : पुढारी वृत्तसेवा; परराज्यातील काही नागरिक गोमंतकीय नावे धारण करण्यासाठी नाव बदल कायद्याचा आधार घेऊन आपली नावे विशेषतः आडनावे बदलत होते. मात्र, आता गोवा सरकारने नाव बदल कायद्यामध्ये दुरुस्ती करून नाव बदलासाठीच्या प्रक्रियेत नवी  तरतूद केली आहे. न्यायालयाने मान्यता दिल्यानंतरच नावात बदल होईल. मात्र त्यासाठी सदर व्यक्तीचा आजी, आजोबा किंवा आई-वडील गोव्यात जन्माला आलेले असायला हवेत. सदर व्यक्ती गोव्यात जन्माला आली म्हणून त्याला गोमंतकीय आडनाव  बदल करता येणार नाही. मात्र त्याचे आई-वडील किंवा आजी-आजोबा गोव्यात जन्मलेले असतील व न्यायालयाने मान्यता दिली तरच त्याचे नाव तथा आडनाव बदल होणार आहे, अशी माहिती कायदामंत्री निलेश काब्राल यांनी दिली.

 गोमंतकीय नावे

आज सचिवालयातील कक्षात  पत्रकार परिषदेत माहिती  देताना काब्राल यांनी  सांगितले की,  ओबीसी व इतर जातीच्या लोकांना मिळणाऱ्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी परराज्यातील काही नागरिकांनी गोव्यातील नाईक तसेच गावडे आदी आडनावे धारण करण्याचे सत्र सुरू केले होते. वर्तमानपत्रात जाहिराती देऊन आणि नोंदणी खात्यात नोंदणी करून एक प्रतिज्ञापत्र सादर करून ही नाव बदल होत होते. मात्र त्यामुळे मूळ गोमंतकीय नागरिकांना आरक्षणाचा लाभ कमी  मिळण्याचे प्रकार होऊ लागले. भंडारी समाज संघटना, बहुजन महासंघ, एसटी तथा आदिवासी संघटना या सर्वांनीच नाव बदल कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गोवा सरकारने नावे बदलण्याच्या कायद्यात नवा बदल केला असून ज्या व्यक्तीचे आई-वडील किंवा आजी-आजोबा गोव्यात जन्मलेले असतील त्यांनाच नाव बदलासाठी अर्ज करता येईल. त्या नंतर न्यायालयामध्ये सदर अर्जावर सुनावणी  होईल आणि सर्व प्रकारची तपासणी झाल्यानंतरच नाव  तथा आडनाव बदलास मान्यता देण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

गोव्यात गेल्या काही वर्षापासून विशेषत; राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्‍चिम बंगाल येथील नागरिकांनी आपले नाव तसेच ठेवून आडनाव नाईक करण्याचे सत्र सुरु केले होते. काहीनी भंडारी समाजातील मुलीशी लग्न करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे विविध संघटना जागृत झाल्या आणि त्यांनी सरकारने नाव बदल कायद्यामध्ये बदल घडवून आणण्याची मागणी केली होती.

हेही वाचलंत का?

Back to top button